तयारी विधानसभेची : सोलापूरमध्ये 'वंचित'च्या भूमिकेवरच विधानसभेची होणार आकडेमोड

सोलापूर लोकसभा येत असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर सोलापूर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या सहाही विधानसभा मतदारसंघातून मोदी लाटेत अॅड. बनसोडे यांना भरभरून मताधिक्‍क्‍य मिळाले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलल्याचे दिसले. यातील अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा व शहर मध्य मतदारसंघातून कॉंग्रेस, मोहोळमध्ये राष्ट्रवादी तर शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या 'एंट्री'ने सोलापुरातील लढतीत प्रचंड रस्सीखेच निर्माण केली. त्यांच्या भूमिकेवरच विधानसभेची आकडेमोड होणार हे निश्‍चित!
तयारी विधानसभेची : सोलापूरमध्ये 'वंचित'च्या भूमिकेवरच विधानसभेची होणार आकडेमोड
Published on
Updated on

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत जरी भारतीय जनता पक्षाकडून जवळपास दीड लाखांच्या मताधिक्‍क्‍याने अॅड. शरद बनसोडे यांनी बाजी मारलेली असली तरी विधानसभेच्या सहाही मतदारसंघापैकी दोनच मतदारसंघात भाजपचे प्रतिनिधी निवडून आले. उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी कॉंग्रेसने तर एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने विजय प्राप्त केला होता. त्यामुळे लोकसभेला कोण निवडून आला याला विधानसभा निवडणुकीत फारसे महत्त्व नाही. 

सोलापूर लोकसभा येत असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर सोलापूर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या सहाही विधानसभा मतदारसंघातून मोदी लाटेत अॅड. बनसोडे यांना भरभरून मताधिक्‍क्‍य मिळाले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलल्याचे दिसले. यातील अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा व शहर मध्य मतदारसंघातून कॉंग्रेस, मोहोळमध्ये राष्ट्रवादी तर शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या 'एंट्री'ने सोलापुरातील लढतीत प्रचंड रस्सीखेच निर्माण केली. त्यांच्या भूमिकेवरच विधानसभेची आकडेमोड होणार हे निश्‍चित! 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात 2009चा अपवाद वगळता कॉंग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदारकीचा किल्ला शाबूत ठेवला. विधान परिषदेला केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्र्यांशी जवळीकता वाढल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मकता दिसल्याने सध्या सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रचंड जनसंपर्क वाढविला आहे. या मतदारसंघात असलेल्या मैंदर्गी, दुधनी व अक्कलकोटपैकी अक्कलकोटमध्ये भाजप, मैंदर्गीत चंचूप्रवेश तर दुधनीचे नगराध्यक्षपद मिळविलेल्या भाजपने आपली ताकद वाढविली आहे. तरीही ऐनवेळच्या खेळीने दिग्गजांनाही आकाश दाखविण्याचे म्हेत्रे यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या दोघांबरोबर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. मोहोळ मतदारसंघातून गेल्यावेळी निवडून आलेले आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणात जामीन न मिळाल्याने सध्या जेलची हवा खात आहेत. परंतु त्यांनी अल्पावधीत केलेल्या कामांची चुणूक मतदारांना लुभावून गेली आहे. या राखीव मतदारसंघातून जामीन मिळाल्यानंतर आपण पुन्हा निवडणूक लढविणारच असा विश्‍वास कदम यांनी व्यक्त केला आहे. 

युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांच्या विरोधात नगरसेवक मनोज शेजवाल पुन्हा इच्छुक आहेत. कदम यांना निलंबित केल्याने राष्ट्रवादीकडून सोलापूर शहर-जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुधीर खरटमल यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर उद्योगपती अर्जुनराव वाघमारे यांचीही तयारी आहे. शहर मध्य मतदारसंघापेक्षा 'सेफ' म्हणून प्रणिती शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. तर युती न झाल्यास भाजपकडून अथवा ऐनवेळी राष्ट्रवादीकडूनही अॅड. शरद बनसोडे यांच्या उमेदवारीची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी अडचण होण्याची शक्‍यता आहे. माकपचे कॉ. न. ना. आडम मास्तर आणि एमआयएमचे शहराध्यक्ष तौफीक शेख यांच्यात कुरघोडी होईल. गतवेळच्या निवडणुकीत एमआयएमकडून रिंगणात उतरलेल्या  शेख यांनी कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना चांगलीच लढत दिली होती. ही जागा युतीत शिवसेनेला सुटेल. महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांना गतवेळी थोडक्‍या मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तेही यावेळी लढत देतील.

युती झाली तर मात्र ही जागा जिंकण्यासाठी सोपी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपकडून हॅटट्रीक साधलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दरवेळेप्रमाणे यंदाही विरोध होणारच. परंतु त्यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट होणे अशक्‍य असल्याने व तगडा उमेदवारच मिळत नसल्याने सामना एकतर्फीच होतो. यंदा वंचित बहुजन आघाडीकडून येथे नगरसेवक आनंद चंदनशिवे निवडूक रिंगणात येतील. 

सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात पुन्हा कॉंग्रेसकडून दिलीप माने यांच्याशी लढत होईल. गतवेळी युती नसताना शिवसेनेकडून निवडणूक लढविलेल्या गणेश वानकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा पत्ता खुला झाल्यानंतर चित्र समजणे सोप्पे होणार आहे.

युती न झाल्यास जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांचीही तयारी आहे.  सर्वात महत्वाचा असलेला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून यंदा पुन्हा आमदार भारत भालके यांनी जुळवणी सुरू केलेलीच आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. सेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. शैला गोडसे यांनी मतदारसंघाची बांधणी सुरू केलीच आहे. समाधान आवताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीचा त्यांचा मार्ग मोकळा होणार हे निश्‍चित ! 

असे आहे राजकीय चित्र
-आघाडी व युती यावर सहाही मतदारसंघाचे चित्र ठरणार 
-उमेदवारी नाकारल्याने ऍड. बनसोडे राष्ट्रवादीकडून इच्छुक होण्याची शक्‍यता 
-शहर मध्य मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसमोर मोठा पेच 
-पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील बेबनावाचा फटका 
-मुख्यमंत्र्यांचा खेळीतून पक्षांतराची मोठी 'गेम' 

असेआहेत पक्षनिहाय इच्छुक
भाजप - सुभाष देशमुख, विजय देशमुख, ऍड. शरद बनसोडे, सचिन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, क्षीरसागर बंधू, लक्ष्मण ढोबळे, अर्जुनराव
वाघमारे 
कॉंग्रेस - प्रणिती शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके 
वंचित बहुजन आघाडी - तौफीक शेख, फारुक शाब्दी, कॉ. न. ना. आडममास्तर, 
राष्ट्रवादी - शरद बनसोडे, सुधीर खरटमल, 
शिवसेना - महेश कोठे, मनोज शेजवाल, सौ. शैला गोडसे, गणेश वानकर, अमर पाटील 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com