पवारांच्या आवाहनामुळे नागनाथअण्णांच्या साराबंदी चळवळीच्या आठवणी ताज्या 

पवारांच्या आवाहनामुळे नागनाथअण्णांच्या साराबंदी चळवळीच्या आठवणी ताज्या 

वाळवा : नागपूर येथे मंगळवारी झालेल्या जनआक्रोश मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांनी "सरकारी देणी देऊ नका'असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले आणि 47 वर्षापुर्वीच्या वाळव्यातील आंदोलनाच्या स्मृती ताज्या झाल्या. 1972 ला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली साराबंदीची चळवळ झाली होती. शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत सलग आठ वर्षे ही साराबंदीची चळवळ चालली. 

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या साराबंदी चळवळीमागे महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीची प्रेरणा होती. या चळवळींमुळे वाळवा हे क्रांतीचे, पुरोगाम्यांचे, तत्कालीन कॉंग्रेस विरोधकांचे गाव म्हणून राजकीय क्षेत्राला परिचित होते. पर्यायाने या गावाला विकासाची कोणतीही योजना देताना सापत्नभाव ठरलेला असायचा. 

त्यावेळी वाळवा - इस्लामपूर रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाची मागणी होती. मात्र राज्यकर्त्यांकडून वर्षानुवर्षे या मागणीकडे दुर्लक्ष झाले. मग आत्ता सरकारलाच नमवायचे या भुमिकेतून नायकवडी यांनी रस्ता होईपर्यंत साराबंदी आंदोलनाची हाक दिली. या हाकेला परिसरातून प्रचंड म्हणजे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आठ वर्षे साराबंदीची चळवळ सुरु राहिली. ना रक्तपात ना दंगाधोपा ना रास्तारोको. अहिंसक पध्दतीने हे आंदोलन झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांनी मग त्यात मध्यस्थी केली आणि वाळवा - इस्लामपूर रस्त्याच्या कामाचा सुरुवात झाली. त्यातही पुन्हा राजकीय मेख मारण्यात आली. काम इस्लामपूरकडून सुरु झाले. पुन्हा नागनाथअण्णांनी संघर्ष केला आणि काम वाळव्याकडून सुरु करायला भाग पाडले. साराबंदीच्या या चळवळीचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. त्यानंतर आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्‍यांच्या पाणीप्रश्‍नासाठीही नागनाथअण्णांनी साराबंदीची हाक दिली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com