

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होण्यासाठी आता जेमतेम पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. साधारणतः गेल्या सहा -आठ महिन्यांपासूनच या निवडणुकीच पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. २०११पासून सलग सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परंतु, हे आव्हान सोपे नाही.
या वर्षअखेरीस बिहारमधील निवडणूक झाल्यानंतर पुढील वर्षी एप्रिल-मेच्या सुमारास पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभेची मुदत सात मे २०२६ रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे सरचिटणीस व त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी कृती आराखडा तयार केला आहे.
या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र गेल्या वर्षभरात काही वेळा दिसले होते. दोन पिढ्यांमध्ये असलेल्या फरकामुळे कार्यपद्धतीतील हा फरक आहे, असे पक्षाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील निवडणुकीसाठी दोघांनीही एकत्रितपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसने सर्व शक्यतांचा विचार करून दशसूत्री आराखडा तयार केला आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात बदल केले जातील हे निश्चित
१. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अर्थातच ममता बॅनर्जी ह्याच असतील. बॅनर, होर्डिंग आणि पोस्टरपैकी ९० टक्के साहित्यांवर त्यांचाच चेहरा असेल. तर दहा टक्के साहित्यावर अभिषेक यांचा चेहरा असणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार, असे अनेक नेते असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच भाजप निवडणूक लढविणार आहे. त्याच प्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढविण्याचे ‘तृणमूल’चे धोरण आहे. ममता यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि त्या राज्यातील सर्वांत लोकप्रिय नेत्या आहेत.
२. पक्षाचा किल्ला दिल्लीमध्ये लढविण्याची जबाबदारी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टाकण्यात आली आहे. ते पक्षाचे लोकसभेतील नेते आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व बैठकांत तेच प्रतिनिधित्व करतात. तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि इतर युवक नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात अभिषेक अधिक आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडतील.
३. समाज माध्यमांद्वारे पक्षाच्या प्रचाराचे धोरण ठरविण्याची जबाबदारीही अभिषेक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्षांशी स्वतंत्रपणे ऑनलाइन बैठकांचा सपाटा अभिषेक यांनी सुरू केला आहे. याशिवाय त्यांनी मतदारांच्या ओळखपत्राचा विषय उपस्थित केला आहे. पडद्यामागे राहून ते या सर्व गोष्टी हाताळत आहेत.
४. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी तृणमूलची साथ सोडल्यानंतर ती जबाबदारी आता प्रतीक जैन यांच्याकडे देण्यात आली आहे. ते अभिषेक यांच्याबरोबर काम करतील. जनतेच्या आशा आकांक्षा समजून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
५. जिल्हापातळीवरील उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे काम अभिषेक करतील, त्यावर अंतिम शिक्कामोर्तब ममता बॅनर्जी करतील. जुन्या - नव्यांची नोट बांधण्याची जबाबदारी ममतांनी स्वतःकडे घेतली आहे. नवे-जुने या वादामुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये गटबाजी निर्माण झाली असेल, तर ती दूर करून समतोल साधण्याचे काम ममता बॅनर्जी करतील.
६. महिलांना व्यवसायासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या लक्ष्मीर भांडार सारख्या सरकारी योजनांचा आढावा घेणे ममता बॅनर्जी यांनी सुरू केले आहे. विविध योजनांमध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा माहिती त्या राज्याच्या मुख्य सचिवांच्या बरोबरीने घेत आहेत.
७. राष्ट्रीय पातळीवर माध्यम समन्वयाचे काम खासदार डेरेक ओब्रायन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, तर राज्यात ही जबाबदारी प्रवक्ते कुणाल घोष यांच्याकडे देण्यात आली आहे.
भाजपने उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्याला आक्रमकपणे उत्तर देण्याचे काम हे दोघे करत आहेत. ममता बॅनर्जी यांचे सर्व कार्यक्रम लोकांपर्यंत विविध समाजमाध्यमांद्वारे पोचविण्याची जबाबदारीही या दोघांकडे आहे.
८. भाजपकडून दिग्गज प्रचारकांची फौज प्रचारासाठी उतरणार आहे. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह व्रात्य बसू, शशी पांजा, चंद्रिमा भट्टाचार्य, जयप्रकाश मजुमदार आदी नेत्यांकडे जिल्हाजिल्ह्यांमध्ये प्रचाराची धुरा सोपविली आहे.
१०. भाजपच्या जय श्रीराम, जय मा काली, जय मा दुर्गा या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून तृणमूलने बंगाली अस्मितेचा मुद्दा पुढे केला आहे. घुसखोरांची नावे मतदारयादीतून वगळण्याची मागणी भाजपने केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मतदार याद्यांतील घोळाचा मुद्दा तृणमूलने पुढे केला आहे.
१०. बंगाली अस्मितेचा मुद्दा हे हिंदुत्व विरोधी किंवा हिंदी विरोधी ठरू नये, म्हणून या मोहिमेमध्ये कीर्ती आझाद आणि इतर बिगरबंगाली नेत्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. पश्चिम बंगालबाहेर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांबरोबर भेदभाव करण्यात येत असल्याबद्दल आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याला प्रत्युत्तर म्हणून ही मोहीम सुरू केली होती.
तृणमूल काँग्रेसने अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या महिला, युवक आणि कामगार शाखेसाठी नवे ब्लॉक अध्यक्ष आणि नवे शहर अध्यक्ष नेमले आहेत. ऐन दिवाळीत या नेमणुका केल्या आहेत. नादिया, वीरभूम, बशीरहाट यासह ३५ संघटनात्मक जिल्ह्यांत या नेमणुका केल्या आहेत. तसेच कोलकता उत्तर व दक्षिण, उत्तर २४ परगणा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांच्या समित्यांचीही फेररचना केली आहे.
दुर्गापूजेनंतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बिजोय सम्मेलनांचेही आयोजन पक्षांतर्फे करण्यात येत आहे. आतापर्यंत असे ६० कार्यक्रम झाले आहेत. ५० मंत्री, खासदार आणि आमदारांना राज्याच्या विविध भागांत जाऊन सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी दिली आहे. बंगालमध्ये लवकरच मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी होणार आहे, ती सुरू होण्यापूर्वी सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट तृणमूलने ठेवले आहे.
यावर्षी पावसाळ्यामध्ये दामोदर खोऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे पश्चिम बंगालच्या काही भागात पूर आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या मुद्द्यावरून तृणमूल व भाजप आमने सामने उभे ठाकले आहेत. निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा येण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील खरी निवडणूक ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशीच होणार आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. सुमारे २०० जागा निवडून येतील असा दावा शहा यांनी गेल्या केला होता. प्रत्यक्षात ७५ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. आता भाजपचे संख्याबळ ६५ वर आले आहे. कारण निवडून आलेल्या दहा जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते आता तृणमूल सोबत आहेत. यावेळच्या निवडणुकीची सूत्रे भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे सोपविली आहे.
महाराष्ट्रातील गेल्यावेळची आणि मध्य प्रदेशातील २०२३ मधील निवडणूक भाजपला जिंकून देण्यात भूपेंद्र यादव यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले जाते. मोदी - शहा यांना बंगाली जनता ‘बाहेरचे नेते’ मानते. तर ममता बॅनर्जी यांना ‘बंगाल की बेटी’. भूपेंद्र यादव हे राजस्थानातील अलवर येथील आहेत. गेल्या म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील ८० हजार पोलिंग बूथपैकी ७० टक्के बूथवर भाजपचे प्रतिनिधी नव्हते, अशी माहितीही अंतर्गत आढाव्यावेळी पुढे आली आहे. आता पुढील पाच महिन्यांत कार्यकर्त्यांची फौज भूपेंद्र यादव कशी उभी करणार हा खरा प्रश्न आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. आगामी निवडणुकीनंतर तुम्ही माजी मुख्यमंत्री असाल, असे त्यांनी म्हटले आहे. ‘‘गेल्या वेळपेक्षा २०२६मध्ये जास्त जागा जिंकू,’’ असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ‘‘गेल्या वेळी मी तुम्हाला नंदीग्राममधून पराभूत केले होते, आता यावेळी तुम्हाला माजी मुख्यमंत्री करू,’’ असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद पुन्हा रंगण्याचीच चिन्हे आहेत.
मतदार याद्यांची सखोल तपासणी करण्याची मागणीही अधिकारी यांनी केली आहे. तसे झाल्यास बांगलादेशातून आलेले रोहिंग्या मुस्लिम घुसखोर कोण आहेत ते कळेल. एकाही रोहिंग्या मुस्लिमाचा समावेश मतदार यादीत असता कामा नये, अशी अधिकारी यांची भूमिका आहे.
बेरोजगारीचा मुद्दाही निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे. राज्यातील सर्वांना रोजगार दिल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्याला भाजपनेते सुवेंदू अधिकारी यांनी उत्तर दिले आहे. `सर्वांना रोजगार दिला आहे, तर राज्यातील दोन कोटी १५ लाख नागरिक बेरोजगार का आहेत? राज्यातून ६० लाख कामगार स्थलांतरित का झाले आहेत?,` असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
पश्चिम बंगालमधील मतदारांचे ‘मॅपिंग’ धीम्या गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मॅपिंगसाठी १४ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत २४ पैकी केवळ सात जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी (डीईओ) काम पूर्ण केले होते. विशेष विशेष सखोल तपासणी (एसआयआर) सुरू करण्यापूर्वीची ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ‘मॅपिंग’ प्रक्रिया पूर्ण केलेल्या सात जिल्ह्यांमध्ये झारग्राम (५१.३६ टक्के), पश्चिम मेदिनीपूर (६२.९४ टक्के), कालिम्पाँग (६५.२७ टक्के), अलिपुरद्वार (५३.७३ टक्के), पुरुलिया (६१.२९टक्के), कोलकता उत्तर (५५.३५ टक्के) आणि मालदा (५४.४९ टक्के) यांचा समावेश आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये आरोप - प्रत्यारोपांची राळ उडायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा सत्ता राखण्याचा निर्धार व्यक्त केला असून भाजपने परिवर्तनाचा नारा दिला आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही आघाडी साधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.