दाभोळ : सूर्यकांत दळवी यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावी, अशी मागणी करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
वरळी, शिवडी आदी मुंबईतील शिवसेनेचे आमदारांनी आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली असतानाच कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीरपणे केली होती. मात्र, आदित्य दापोलीत विधानसभा निवडणूक लढविण्यास येणार नाहीत, हे दळवी यांनाही माहिती आहे. मग ते ही मागणी का करत आहेत असा प्रश्न पडतो .दापोली विधानसभा मतदारसंघात 2014 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच टर्म आमदारकी भोगलेल्या दळवी यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी पराभव केला होता .
त्यानंतर काही काळ दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला आलेली मरगळ लक्षात आल्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना घेऊन दापोली विधानसभा मतदारसंघात 'एंट्री' घेतली. त्यानंतर सुमारे 4 वर्षे योगेश कदम यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या सहकार्याने दापोली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. त्यामुळे योगेश कदम शिवसेनेत आपोआप 'सेट' झाले व दळवी यांचे राज्य आपोआप खालसा झाले.
त्यामुळे आदित्य ठाकरेंनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी दळवी करत आहेत. आदित्य ठाकरे खरोखर निवडणूक लढवायला आले तर कदमांचा पत्ता कट होईल. आणि नाही आले तरी आपल्याला निवडणूक लढविण्याची मागणी करणाऱ्या दळवींविषयी आदित्य ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर राहील. त्यामुळे योगेश कदम की दळवी असा प्रश्न निर्माण झाल्यास दळवींचे पारडे निष्ठावंत म्हणून जड राहील असे त्यांचे डावपेच दिसतात .
तेव्हापासून दळवी कदम यांचेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आपल्या मागणीमुळे योगेश कदम यांचा 'पत्ता' आपोआप कट होईल व आपला एक प्रतिस्पर्धी आपोआप बाद होईल, अशी व्यूहरचना करण्याचा सूर्यकांत दळवी यांनी प्रयत्न आहे. पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूर्यकांत दळवी असे नथीतून तीर मारण्याचे प्रयोग अधुनमधुन करत असल्याची चर्चा दापोलीत सुरू आहे.
मोजकीच मंडळी दळवींसोबत
योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या सहकार्याने दापोली विधानसभा मतदारसंघात कोटयवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिकांचा ओढा योगेश कदमांकडे वाढलेला असून सूर्यकांत दळवी यांच्याकडे असणारे बहुसंख्य शिवसैनिक व पदाधिकारी योगेश कदम यांचेकडे गेले असून हातावर मोजण्याएवढीच मंडळी आता दळवी यांचेकडे उरली आहे.
या संदर्भात युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रबळ दावेदार योगेश कदम यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास आम्ही त्यांना जिवाचे रान करून निवडून आणू व मुख्यमंत्री करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.