पगडी बदलणाऱ्या पवारांच्या आरोपांना उत्तर देणार नाही : तावडे

मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य केले आहे. तावडे यांनी मात्र या आरोपांना उत्तर न देण्याची भूमिका घेतली आहे. तावडे यांच्या या पावित्र्यावर आता पवार काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.
शरद पवार, विनोद तावडे
शरद पवार, विनोद तावडे

पुणे : निवडणुका जवळ आल्यानंतर शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू माणसे खूप राजकीय बोलतात. त्यांच्या राजकीय पत्र व्यवहाराला उत्तर द्यायचे कारण नसते. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील बहुजन समाजामधील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, याकडे लक्ष आहे. बहुजन समाजाच्या मतावर डोळा ठेवून, जे पगड्या बदलतात, त्यांना उत्तर देण्याचे कारण नाही, असे मत व्यक्त करत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

 
सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शाळाबंदीचा निर्णय या सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी वाईट निर्णय होता, असे वक्तव्य पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत तावडे यांना विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले. 

"सिंहगड इन्स्टिट्यूट'मध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत विचारले असता तावडे म्हणाले, ""सिंहगड इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार फारसा हस्तक्षेप करू शकत नाही. राज्य सरकारला शक्‍य आहे, तेवढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.''

 
लवकरच प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविली जाईल. शुल्क नियंत्रण कायदा अंतिम टप्प्यात असून, येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होण्याची शक्‍यता आहे, असे सूतोवाचही तावडे यांनी या वेळी केले. अधिवेशन सुरू होत असल्याने काही विषयांवर बोलता येणार नाही, असे सांगत ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. 

शिक्षक भरतीचा पुढील टप्पा 15 दिवसांत 

ऑनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत, हे नुकतेच ग्राम विकास खात्याने कळविले आहे. त्या जागांसाठी लवकरच वित्त विभागाकडून मान्यता घेण्यात येईल. पवित्र पोर्टलवरील पुढील टप्पा येत्या 15 दिवसांत सुरू होईल. पोर्टलवरील भरती प्रक्रियेतील "भाग एक'बरोबरच कागदपत्रांची पडताळणीदेखील केली जाईल. सर्व विभागाकडून शिक्षक भरतीच्या जागांची माहिती आठवडाभरात मिळेल, अशी माहिती तावडे यांनी दिली. 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता रद्द होणार, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आता साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडेल आणि खऱ्या अर्थाने साहित्याचा आनंद घेता येईल. संमेलनाध्यक्ष ठरविण्यासाठी साहित्य महामंडळ योग्य ती पावले उचलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com