योगायोगाने राजकारणात आलो अन्यथा पत्रकार लेखक झालो असतो - अतुल भातखळकर, भाजप, कांदिवली

मी लहानपणापासून मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलो. बी कॉम झाल्यावर जर्नालिझमचा कोर्सही केला व त्यानंतर संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून भिवंडी आणि सिंधुदुर्ग येथे कामही केले. दी. वि. गोखले यांनी मला पत्रकारितेत येण्यास सांगितले होते. मात्र तेव्हा राज्य भाजपचे संघटनमंत्री धरमचंद चोरडिया व रघुनाथ कुलकर्णी यांनी माझ्या घरी येऊन पक्षासाठी पूर्णवेळ काम करण्यास सांगितले. अशाप्रकारे योगायोगानेच मी राजकारणात आलो, अन्यथा पत्रकार किंवा लेखक झालो असतो.
BJP Mla Atul Bhatkhalkar Telling About his Political Journey
BJP Mla Atul Bhatkhalkar Telling About his Political Journey
Published on
Updated on

शिकत असताना राजीव गांधींमुळे मी ही भारावलो होतो, तेव्हाचा काळ तसाच होता. हा तरुण पंतप्रधान देशाचं काही भलं करतोय का ते पाहूया, एकदम त्याच्यावर टीका करू नये, असे वादही मी घातले होते. १९८७ ते १९९१ या काळात शिक्षण व जर्नालिझमचा कोर्स झाल्यावर इंग्रजीत पत्रकारिता करायची ठरवली होती, एका वर्तमानपत्रात प्रयत्नही केले होते. मात्र चोरडिया व कुलकर्णी हे माझ्या घरी आले हा टर्निंग पॉईंट ठरला. संघ प्रचारक म्हणून आमचा परिचय होता व बैठकांमध्ये भेटही झाली होती. तेव्हा पक्ष लहान होता व चांगल्या कार्यकर्त्यांना शोधून पक्षात घेणे ही तेव्हापासून परंपरा होती. त्यानंतर मी पूर्णवेळ पक्षाचे काम करू लागलो. 

१९९२ मध्ये प्रदेश कार्यालयप्रमुख ही पहिली जबाबदारी पक्षाने दिली. तेव्हा प्रमोद महाजन हे महाराष्ट्र भाजपच्या दैनंदिन कामात लक्ष घालत होते. तेव्हा मी त्यांच्या संपर्कात आलो, त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यावर पक्षाने मला प्रदेश सरचिटणीस व प्रसिद्धीप्रमुख या जबाबदाऱ्या दिल्या. याच दरम्यान मी डंकेल आणि डब्ल्यूटीओ विषयावर पुस्तके लिहिली, अन्य लिखाणही सुरुच होते. सन २००० मध्ये प्रवक्तेपद तर तीन वर्षांनी मुंबई भाजपचे सरचिटणीसपद मिळाले. 

विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाल्यावर कांदिवली (पूर्व) हा नवा मतदारसंघ निर्माण झाला. तेव्हा सेना-भाजप युती असल्याने युतीत भाजपला कोणते मतदारसंघ मिळतील याचा अंदाज घेऊन कांदिवली (पूर्व) साठी दोन-तीन वर्षे आधीपासूनच काम सुरु केले. मात्र २००९ मध्ये मला काही कारणांमुळे पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यावर्षी तेथून काँग्रेसचे रमेशसिंह ठाकूर निवडून आले. तरीही मी तेथे सतत काम करीत राहिलो व त्याचे फळ २०१४ च्या निवडणुकीत मिळाले. युती तुटली तरीही तेथून मी सहजपणे निवडून आलो. पहिल्या टर्ममध्ये आमदार म्हणून शंभर टक्के उपस्थिती होती. आमदार म्हणून केलेल्या कामगिरीबाबत तीन संस्थांचे पुरस्कारही मिळाले. पुन्हा २०१९ मध्ये वाढत्या मताधिक्याने जिंकलो. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर मला आवड असूनही पत्रकारितेत नोकरी करता आली नाही. राजकारण, अर्थशास्त्र हे आवडीचे विषय असल्याने त्याचे वाचनही खूप केले. वाचन, अध्ययन, लिखाण ही खरी आवड होती, पुष्कळ पुस्तिकाही लिहिल्या. वर्तमानपत्रात लिखाण केले, सभांमध्ये तसेच वाहिन्यांवर भाषणे केली. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवट का टिकली, या विषयावर पहाणीसाठी १९९७ मध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे माझ्या नेतृत्वाखाली एक पथक गेले होते. त्या विषयावरही मी पुस्तिका काढली होती. २००५ मध्ये अमेरिकेच्या इंटरनॅशनल व्हीजीटर्स प्रोग्राम मध्ये भारत, पाकिस्तान व बांग्लादेशच्या तरुण राजकारण्यांना अमेरिकी दौऱ्यावर नेले होते. त्यात भारतातून मी व धर्मेंद्र प्रधान असे दोघेच होतो. 

चोरडिया व कुलकर्णी हे माझ्या घरी आले व मी योगायोगानेच राजकारणात आलो. जनसेवेची संधी मिळाली. अन्यथा पत्रकार किंवा लेखक नक्कीच झालो असतो. आता मिळालेल्या संधीचे सोने करून जनसेवेचा वसा घेतला आहे, तो सोडणार नाही हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com