संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी एक मजेशीर फोटो व्हायरल झाला. राजकारणात भलेही विविध पक्ष एकमेकांविरोधात तलवारी उपसत असतील पण एका मोबाईलच्या स्क्रीननं सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र आणलं आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान, काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी हे तिघेही एकाच फ्रेममध्ये कैद झाले आहेत. मोबाईलमध्ये पाहताना या तिघांचा फोटो व्हायरल झाला आहे.
या तिन्ही नेत्यांच्या नजरा एकाच मोबाईल फोनमध्ये आहेत, काहीतरी बरंच उत्सुकतेनं ते पाहाताना दिसत आहेत. संसदेत मोठी गरमागरमी सुरु असतानाच हा मैत्रीभावाचा फोटो समोर आला आहे.
संसदेच्या आवारात दीपेंद्र हुड्डा आणि चिराग पासवान हे एकमेकांना धडकले. त्यानंतर दोघांनी थांबून मोठ्या उत्साहात हस्तांदोलन केलं. त्याचवेळी तिथं प्रियांका चतुर्वेदी पोहोचल्या.
त्यानंतर हुड्डा यांनी आपल्या खिशातून फोन काढला आणि त्यात चतुर्वेदींना काहीतरी दाखवत होते. पुढे चिराग पासवान हे देखील मोबाईलमध्ये एकटक बघत राहिले.
पीटीआयनं या तिन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. खरंतर हा कँडीड क्षण कॅमेरॅत कैद झाला, यातून एक वेगळाच अर्थही निघाला. तो म्हणजे राजकारण बाजुला ठेवत तिन्ही नेत्यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली.
संसदेत किंवा बाहेर राजकारण करताना विचारधारेच्या आधारावर राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडतात. पण त्यांच्यात खरंतर चांगली मैत्री देखील असते हे अशा काही खास क्षणांमधून पाहायला मिळतं.
या तिन्ही खासदारांच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले असून त्यावर युजर्सही सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत.