ओवळा माजिवडा : प्रताप सरनाईक यांचा  मतदारसंघात वरचष्मा

ओवळा माजिवडा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, कॉंग्रेस आघाडीचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे संदीप पांचगे अशी तिरंगी लढत होत आहे. मराठीबहुल असलेल्या या मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्‍यता आहे.
Pratap Sarnaik - Vikrant Chavan - Sandip Pachange
Pratap Sarnaik - Vikrant Chavan - Sandip Pachange
Published on
Updated on

वळा माजिवडा मतदारसंघ मिश्र वस्तीचा म्हणून ओळखला जातो. एकीकडे या मतदारसंघात झोपडपट्टीचा भाग येतो. त्याच वेळी घोडबंदरची उच्चभ्रू वस्तीही याच मतदारसंघात येते.विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांचा आजच्या घडीला या मतदारसंघात वरचष्मा आहे. या मतदारसंघात शिवसेनेची बांधणी कॉंग्रेस आणि मनसेच्या दृष्टीने अधिक भक्कम आहे. पण त्याचवेळी शिवसेनेतील अनेक पदाधिकारी यंदाच्या विधानसभेसाठी इच्छुक होते. शिवसेनेत सहसा विद्यमान आमदारांच्या विरोधात उमेदवारी मागण्याची परंपरा नाही. पण या मतदारसंघात महापौर मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा आदींनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. अशा वेळी त्यांची नाराजी दूर करून त्यांना मुख्य प्रचारात आणण्यासाठी सरनाईक यांची कसोटी लागणार आहे.

ओवळा माजिवडा मतदारसंघात सरनाईक यांची स्वतःची एक बांधणी आहे. गेल्या विधानसभेत त्यांना भाजपच्या संजय पांडे यांनी चुरशीची लढत दिली होती; पण यंदा भाजपबरोबर युती असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ही जमेची बाब ठरली आहे. या मतदारसंघात ठाण्याबाहेरून येऊन घोडबंदर रोडवर स्थायिक झालेल्या रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रहिवाशांचा तसा दैनंदिन कारभार मुंबईबरोबर संबंधित आहे. त्यांचा नोकरी-व्यवसाय मुंबईत आहे, पण त्यांना भेडसावणारी घोडबंदरची वाहतूक कोंडी आणि पाण्याची समस्या शिवसेनेसाठी अडचणीची ठरू शकणारी आहे. घोडबंदरचा हा रहिवासी सातत्याने समाजमाध्यमावर व्यक्त होत असतो. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात समाजमाध्यमावर कोणता पक्ष आघाडी घेणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

कॉंग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांच्या दृष्टीने या मतदारसंघातील कॉंग्रेसची कमकुवत झालेली बांधणी अडचणीची ठरत आहे. पण त्याच वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि माजी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांचा त्यांना यंदा सक्रिय पाठिंबा मिळाला आहे. चव्हाण आणि जगदाळे यांचा त्यांच्या प्रभागातील मतदारांबरोबर दैनंदिन संपर्क आहे. आजच्या घडीला ते आपला संपर्क चव्हाण यांच्यासाठी कामी आणत आहेत. स्वतः विक्रांत चव्हाण वर्तकनगर परिसरातून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अशा वेळी जगदाळे आणि चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आजूबाजूच्या लोकमान्यनगर, शिवाईनगर आदी परिसरातील मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्यास चव्हाण यांच्याकडून चुरशीची लढत अपेक्षित आहे.

ठाण्यातील मनसेमधील एक अभ्यासू पदाधिकारी म्हणून संदीप पांचगे यांची ओळख आहे. शहरातील विविध समस्यांबाबत कायम आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात ते माहीर समजले जातात. त्यातही शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट मंत्र्यांची व्यंगचित्रे रस्त्यावर रेखाटली होती. त्या वेळी त्यांना थेट शिवसेनेकडून उत्तर मिळाले नाही. पण आता याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच निवडणुकीनंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. पण या कारवाईनंतरही अशा प्रकारची आंदोलने सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पांचगे यांनी दिला आहे. मराठीच्या विषयावर राजकारण करणाऱ्या मनसेला येथील मतदारांनी हात दिल्यास आणि खऱ्या अर्थाने येथे तिंरगी लढत झाल्यास ती नक्कीच चुरशीची ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com