सांगली : जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याशी माझे भांडण नाही. आमचा बांधाला बांध नाही. ते प्रामाणिक अधिकारी आहेत याबद्दल दुमत नाही. परंतू, पदाधिकारी आणि सदस्यांसोबत त्यांनी थोडे समन्वयाने काम करावे. एवढीच अपेक्षा आहे, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली.
जत तालुक्यातील एका विषयासंदर्भात श्री. खाडे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या कक्षात आज बैठक झाली. त्याला श्री. गुडेवार हेही उपस्थित होते. कालच आमदार खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवलेले पत्र समोर आले होते. त्याबद्दल जिल्ह्यातून नाराजीचा सूरही उमटला. त्यानंतर श्री. खाडे यांनी थोडी संयमित भूमिका घेतली.
ते म्हणाले,""गेल्या महिन्यात मी जिल्हा परिषदेत आलो होतो. तेंव्हा गुडेवार यांची भेट घेतली. त्यांना मी चांगले काम करत असल्याने शुभेच्छा दिल्या. कारवाई करताना हयगय करू नका. भले भाजपचा दोषी असला तरी चालेल, असे सांगितले होते. आजही माझी तीच भूमिका आहे. परंतू, जिल्हा परिषदेत थोडी नाराजी आहे. पदाधिकारी आणि सदस्यांशी गुडेवार यांचा संवाद नाही, असे चित्र समोर आले आहे. सदस्यांनीच ते आमच्यापर्यंत पोहोचवले. त्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना ते सांगितले. काही आमदारांनी त्याची दखल घेत गुडेवार यांच्या बदलीची मागणी करणारे पत्र दिले. ती पत्रे घेऊन सदस्य मला येऊन भेटले. मलाही पत्र द्या, अशी विनंती केली. मी आमदारांची पत्रे पाहिली आणि विषय गंभीर दिसत असल्याने मीही पत्र दिले. वास्तविक, गुडेवारांच्या कामाबद्दल माझी काही तक्रार नाही. आम्ही विरोधी आमदार आहोत. आमच्या पत्राने सरकार थोडीच बदली करणार आहे. यातून एक गोष्ट नक्की, की गुडेवार आणि सदस्यांत समन्वय राहिला पाहिजे, वाढला पाहिजे.''
आमदारांच्या पत्राची कॉपी
आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी एका विरोधी आमदाराच्या पत्राचीच कॉपी केल्याची कबुली दिली. त्या आमदाराने काल पत्रकारांशी बोलताना "मी पत्र पाठवलेलेच नाही', असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे नेमके चाललेय काय, याची चर्चा रंगली आहे.
"स्वाभिमानी' चा इशारा
चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचा डाव उधळून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि वाळवा कार्याध्यक्ष भागवत जाधव यांना दिला आहे. ते म्हणाले, ""गुडेवार कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. जनतेला ताबडतोब न्याय देताहेत. जिल्हा परिषदेत शिस्तबद्ध काम सुरू आहे. भ्रष्टाचाराला पायबंद घातला आहे. त्यांची बदली करण्याचा प्रयत्न थांबवावा. अशा अधिकाऱ्याच्या बदलीसाठी धडपड करणे ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.