Ravindra Chavhan, Shrikant Shinde, Eknath Shinde Sarkarnama
ठाणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी फुकट : भाजपचे 'ऑपरेशन ओव्हरटेक' सुरुच; श्रीकांत शिंदेंभोवतीचा 'ट्रॅप' आवळला

Eknath Shinde : भाजपचे ‘ऑपरेशन ओव्हरटेक’ कल्याण-डोंबिवलीत गती घेत असून शिवसेना व मनसेतील अनेक नेते भाजपकडे वळत आहेत. यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shrikant Shinde : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने थेट शिवसेनेच्या फळीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. मित्रपक्षांमधील ही अंतर्गत चुरस आणि फोडाफोडीमुळे स्थानिक राजकारण तापले आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न आहे. याआधी एकनाथ शिंदेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दीपेश म्हात्रे यांना खेचण्याचा प्रयत्न होता. पण म्हात्रे यांनी अचानक भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे उबाठापेक्षा शिवसेनेतच अधिक खळबळ माजली. मग खबरदारी म्हणून भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असलेल्या इतर नेत्यांना थांबवण्यासाठी पावलं उचलली. महेश गायकवाड यांना कल्याण पूर्व-उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून घोषित करून त्यांना रोखून धरले.

फळी मजबूत करण्याची धडपड :

कल्याण-डोंबिवलीत सध्या ऑपरेशन ओव्हरटेक मोहीम सुरू असून, भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना पक्षात घेतले आहे. यात काँग्रेसचे जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर, हर्षदा भोईर, राष्ट्रवादीचे (NCP) नंदू म्हात्रे आणि मनसेतील अनेक पदाधिकारी. कार्यकर्त्यांना सामील करून घेतले आहे. मागील काही काळात भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधील अनेक चेहरे दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजप स्थानिक पातळीवर आपापली फळी मजबूत करण्यावर भर देताना दिसत आहेत.

माजी नगरसेवकांच्या रांगा

शनिवारी (ता.२२ नोव्हेंबर) आणि रविवारी (ता.२३ नोव्हेंबर) कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये मोठे 'इनकमिंग' होण्याची शक्यता असून, यात शिवसेनेत कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक नवीन गवळी व मल्लेश शेट्टी, तर उबाठातून कल्याण पश्चिमचे माजी नगरसेवक सचिन बासरे व त्यांचे बंधू सुधीर बासरे नेत्यांचा पक्षप्रवेश अपेक्षित आहे, ज्यामुळे दोन्ही शिवसेनेला धक्का बसणार आहेत. शिवाय दिव्यातील उबाठाचे माजी आमदार सुभाष भोईर हेही लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

मनसेलाही फटका बसण्याची शक्यता :

मनसेतीलही काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, मंदा पाटील, कोमल पाटील, कस्तुरी देसाई हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांचे खंदे समर्थक आणि उद्योजक काशिनाथ पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेसोबत मनसेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT