Jitendra Awhad Sarkarnama
ठाणे

Jitendra Awhad Controversy : आव्हाड बोले, वाद होणे, हे कसे न घडणे?

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान-आचार्य :

Dombivli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कायम चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात नेहमीच आंदोलने झाली आहेत. यावेळीही त्यांनी श्री राम मांसाहार करीत होता, असे वक्तव्य केल्यामुळे ते भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेचे धनी ठरले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची बोलण्याची शैली थेट आहे. ते विधाने करताना संदर्भ देतात. तरीही त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरतात आणि त्यांच्याविरोधात आंदोलने केली जातात. त्यामुळे आव्हाड यांचे वक्तव्य आणि वाद हे समीकरण झाले आहे. याची प्रचीती नेहमी येते. शिर्डीच्या शिबिरात त्यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर पुन्हा वादाचा प्रकाशझोत पडला आहे.

यानिमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आढावा घेऊया...

संत श्रेष्ठ तुकाराममहाराज....

जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचा खून झाला होता, असे वक्तव्य जुलै 2018 मध्ये आव्हाड यांनी केले होते. त्यावरून वारकरी संप्रदायाने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. यावेळी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे आव्हाड म्हणाले होते.

आणीबाणीने लोकशाहीचा गळा घोटला

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला, असे वक्तव्य आव्हाड यांनी 2020 मध्ये केले होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले होते. त्यानंतर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काँग्रेसने घेतला, असे सांगत आव्हाड यांनी सारवासारव केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोरोना, कब्रस्तान आणि अल्ला...

मुंब्रा हा आव्हाडांचा विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. 'अल्ला को 2011 मे पता था की 2020 में कोरोना आनेवाला है! इसलिए 2019 में मुंब्रा में नया कब्रस्तान बना'! आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आव्हाडांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा पाडला होता.

सावरकर-गोळवलकर आणि संभाजीराजे

अजित पवारांनी जानेवारी 2023 मध्ये विधानसभेत संभाजीराजेंवर वक्तव्य केले होते. त्यानंतर त्या वक्तव्याला प्रतिसाद देत आमदार आव्हाड यांनी एका पुस्तकाची प्रत समोर ठेवत सावरकर आणि माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजीमहाराजांबद्दल काय लिहून ठेवले ते वाचा, असं आव्हाडांनी ट्विटद्वारे दाखवले होते. 'ह्या शूर वीरास बदनाम करण्याचं काम एका वर्गाकडून अनेक वेळा झालं आहे. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीनं संभाजीराजे हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते. याच्यावर कोणी बोलेल का?' असे आव्हान आव्हाड यांनी केले होते.

औरंगजेब....

फेब्रुवारी 2023 रोजी एका सभेत आव्हाडांनी औरंगजेबाचा उल्लेख मुघलांची औलाद असा केल्यानंतर मुस्लिम समाज नाराज झाला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाने मुंब्रा मतदारसंघातून आम्ही आव्हाडांना मत देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आव्हाडांनी माफी मागितली होती.

सनातन धर्म

मार्च 2023 मध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांंना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात होत्या. याबाबत सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड आहे, असे वक्तव्य आव्हाडांनी केले होते. 'सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारांहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील 95 ते 97 टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले. तो सनातन धर्म आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध नोंदविण्यात आला होता.

छत्रपती शिवाजीमहाराज....

मार्च 2023 मध्ये एका सभेत आव्हाडांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असल्याचे विनोद तावडे म्हणाले होते. त्यावर मग शिवाजीमहाराज ग*** खेळले का ? असा खोचक सवाल विचारत औरंगजेब, अफझलखान आणि शाहिस्तेखान समोर होते, म्हणून शिवाजीमहाराजांचा पराक्रम दिसला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. आव्हाडांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यातून निषेध केला गेला.

गांधीजी, भुजबळ आणि राम

2024 हे वर्ष सुरू होताच भुजबळ सुपारी घेतलेला पोपट आहे, असे वक्तव्य त्यांनी 2 जानेवारीला केले. गांधीजींवर तीन वेळा हल्ले झाले होते. ते ओबीसी तसेच मोठे होत असल्याचे काहींना पाहावले नाही. त्यांची जातिवादातूनच हत्या झाली, असे वक्तव्य त्यांनी 3 जानेवारी रोजी केले होते, तर 3 जानेवारीलाच त्यांनी राम मांसाहार करीत होता, असे विधान केले होते.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT