Thane Municipal Corporation meeting latest updates: ठाणे महापालिकेच्या महासभेत सोमवारी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकमुखाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
प्रश्नोत्तराच्या तासात अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा अपुरी आणि दिशाभूल करणारी उत्तरे मिळाल्याने सभागृहात संतापाची लाट उसळली. अखेर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी हस्तक्षेप करत आयुक्त सौरव राव यांना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे स्पष्ट शब्दांत सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, प्रशासनाने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागाकडूनही ठोस माहिती मिळाली नाही, त्यामुळे सभागृहात प्रशासनाविरोधातील असंतोष उफाळून आला.
वाढता वाद पाहून महापौरांनी हा विषय स्वतंत्र बैठकीत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, नगरसेवकांनी त्याला विरोध करत, “जनतेचे प्रश्न महासभेत विचारले जातात, त्यामुळे त्यांची उत्तरेही याच सभागृहात मिळाली पाहिजेत,” अशी भूमिका घेत प्रशासनाला कोंडीत पकडले. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत, “समाधानकारक उत्तरच मिळणार नसेल, तर प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा उपयोग काय?” असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर महापालिका सचिव मनीष जोशी यांनी पुढील महासभेत पूरक प्रश्न विचारता येतील, असे सांगितले. मात्र, या उत्तराने सदस्यांचा संताप आणखी वाढला. नगरसेवक राम रेपाळे यांनी अधिकाऱ्यांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रत्येक महासभेत २५ ते ३० प्रश्न घेतले जातात; मात्र अधिकाऱ्यांना त्यांची समाधानकारक उत्तरे देता येत नसतील, तर ही लोकप्रतिनिधींची आणि जनतेची दिशाभूल आहे. गरज पडल्यास प्रश्नांसाठी स्वतंत्र महासभा घ्या,” अशी मागणी त्यांनी केली आणि त्यांच्या या भूमिकेला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, सभागृहातील वाढता रोष पाहता महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला कडक शब्दांत फटकारले. “नगरसेवकांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाते, आता अधिकाऱ्यांनाही अचूक, वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने उत्तरे देण्याचे प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे; महासभेचा प्रश्नोत्तराचा तास केवळ औपचारिकता राहू नये,” अशा शब्दात त्यांनी आयुक्तांना भरसभेत सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.