Thane Murder Case: ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर फरार झालेल्या दोन प्रमुख आरोपींना अखेर पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरून ताब्यात घेतले आहे. निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ ‘भावड्या’ अशी या दोघांची नावे आहेत.
ठाणे गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही कारवाई केली. पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोहीम राबवली.
पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयातच गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ उडाली. हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. त्यामुळे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके सक्रिय केली होती.
पोलिसांच्या तपासात दोन्ही आरोपींनी हत्या केल्यानंतर ठाण्यातून तातडीने पलायन केल्याचे समोर आले. आपली ओळख आणि ठावठिकाणा पोलिसांना समजू नये, यासाठी त्यांनी प्रवासादरम्यान अनेक वाहने बदलल्याची माहिती आहे. अखेर दोघे महाराष्ट्र-गोवा सीमेवरील एका डेअरीमध्ये आश्रयाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या डेअरीचालकाचा मिरा रोड परिसरातून यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या काही महिलांशी सातत्याने संपर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कनेक्शनच्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पप्पू शिंदे या संशयिताला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. पूर्णेकर यांचा जवळचा मित्र असलेला पप्पू हल्ल्याच्या वेळी कार्यालयात उपस्थित होता. हल्लेखोरांना त्याने मदत केली का, याचा तपास सुरू आहे. गुरुवारी मिरा रोड परिसरातूनही काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
तपास पुढे सरकत असताना निखिल यादवची पार्श्वभूमीही समोर आली आहे. पूर्णेकर राहत असलेल्या मनोरमा नगर परिसरात तो पूर्वी वडापावच्या गाडीवर काम करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानेच पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. या हत्येसाठी त्याला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय आहे.
दुसरीकडे, नितेश पवार उर्फ ‘भावड्या’ हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याने पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो एका बड्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. आता या हत्येचा नेमका सूत्रधार कोण, हत्येमागे राजकीय संबंध आहेत का आणि आरोपींना कोणी मदत केली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यावर पोलिसांचा भर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.