Education Department: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 9 ते 12वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी पुन्हा राज्य मंडळाकडे; 10 वर्षांनंतर मोठा बदल

Education Department : शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम तसेच पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.
Maharashtra school education
Maharashtra school educationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Education News: राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत मोठा बदल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (SCERT) असलेली अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी आता पुन्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णयाला मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम तसेच पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीचा क्रमांक असेल.

2016 मध्ये जबाबदारी बदलली होती

महाराष्ट्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५नुसार संपूर्ण माध्यमिक शिक्षणक्रमासाठी पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम निश्चित करण्याचा अधिकार राज्य मंडळाला आहे. याच कायदेशीर तरतुदीच्या आधारे यापूर्वी दहावी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून तयार केला जात होता.

Maharashtra school education
LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडर महागला! तुमच्या शहरात किती रुपयांनी वाढला दर?

मात्र, 2016 मध्ये राज्य सरकारने या व्यवस्थेत बदल केला. अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे देण्यात आली, तर पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि छपाईचे काम बालभारतीकडे सोपवण्यात आले. आता ही जबाबदारी पुन्हा राज्य मंडळाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन अभ्यासक्रमासाठी वेळापत्रक ठरले

नव्या व्यवस्थेनुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये नववी आणि अकरावीच्या अभ्यासक्रमासोबत नवीन पाठ्यपुस्तके लागू होतील. त्यानंतर २०२८-२९ मध्ये दहावी आणि बारावीचा नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार केली जातील. राज्य मंडळाकडून तयार होणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईची जबाबदारी बालभारतीकडे देण्यात येणार आहे.

Maharashtra school education
TET Exam: टीईटी पात्रता नसलेल्यांचे टेन्शन वाढले; आता खासगी शाळांतील शिक्षकांचीही तपासणी! शिक्षण विभागाला उशीरा जाग

नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी राज्य मंडळाकडेच असावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. आता ती मान्य झाल्यानंतर नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध विषयांची अभ्यास मंडळे तयार करण्यात आली असून विषय तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यासक्रम निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नववी ते बारावीचा नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाने हाती घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com