Eknath Shinde  Sarkarnama
ठाणे

ठाण्यात शिवसेनेला खिंडार;शाखाप्रमुखासह तीनशे शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

राज्याच्या इतर भागात पक्ष संघटनेत लक्ष घालणाऱ्या शिंदे यांच्या स्वत:च्या मतदारसंघात अशाप्रकारे पडझड झाल्याने आश्‍यर्च व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातच धक्का बसला आहे.त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील एका शाखाप्रमुखांसह सुमारे ३०० शिवसैनिकांनी रविवारी भारतीय जनता पार्टीत प्रवश केला.ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदे यांच्या मतदारसंघातील या घडामोडींमुळे शहर शिवसेनेत खळबळ माजली आहे.

किसननगर येथील शाखा क्रमांक दोनचे शाखाप्रमुख समीर नार्वेकर यांनी आपल्या इतर शिवसैनिकांसह प्रवेश केला. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे तसेच आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.विधानसभा मतदार संघातील युवा सेनेचे निरीक्षक नीलेश लोहोटे, उपशाखाप्रमुख पंकज परब, भरत देसाई, आशिष चव्हाण, नीतेश पवार यांच्यासह अन्य शिवसैनिकांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून देशात विकासाची कामे सुरूआहेत. शिवसेनेकडून नागरिकांना दिलेली प्राथमिक आश्वासनेही पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आपण यापुढे भाजपाचे काम करणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.ज्या भागातून पूर्वी स्वत: एकनाथ शिंदे महापालिकेवर निवडून जात होते.त्याच किसननगर भागातील शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी भाजपाची वाट धरल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. किसननगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. किसननगरमधूनच नगरविकासमंत्री शिंदे यांची महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड होत होती. या भागात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे मजबूत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, भाजपने या अभेद्य तटबंदीलाच खिंडार पाडले. शाखाप्रमुखानेच भाजपात प्रवेश केल्याने शहरात शिवसेनेला हादरा बसल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या खोपट कार्यालयाच्या परिसरात वागळे इस्टेटमधील शिवसैनिकांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती.

राज्याच्या इतर भागात पक्ष संघटनेत लक्ष घालणाऱ्या शिंदे यांच्या स्वत:च्या मतदारसंघात अशाप्रकारे पडझड झाल्याने आश्‍यर्च व्यक्त करण्यात येत आहे.येत्या काळात ठाणे महापालिकेची निवडणूक आहे. या पाश्‍र्वभूमीवर झालेल्या या पक्षांतराचा फटका शिवसेनेला बसू शकतो.कारण आणखी काही जण भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT