MLA Prakash Bharsakale with angry people for roads Sarkarnama
अकोला

रस्त्यांच्या कामासाठी नागरिकांनी आमदाराला सुनावले, पोलिस बंदोबस्तात झाली बैठक...

सरकारनामा ब्यूरो

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली. प्रशासन आणि पदाधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. तेव्हा नागरिकांनी आंदोलने केली. त्यानंतरही कुणी दखल घेतली नाही. अखेर काल आमदार प्रकाश भारसाकळे यांनी या विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी संतप्त नागरिक आमदारांवर तुटून पडले आणि चांगलीच खडाजंगी झाली. शेवटी आमदारांनी रस्त्याची कामे लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितल्यावर लोकांचा रोष कमी झाला.

विशेष म्हणजे, पोलिस बंदोबस्तात ही बैठक घेण्यात आली. कामात दिरंगाई करणाऱ्या सुधीर कंट्रक्शनचा ठेका रद्द झाल्यामुळे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी यापुढे रस्त्यांचे कामे लवकर सुरू करण्याबाबत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले. तेल्हारा तालुक्यातील चारही भागांतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. या रस्त्यांवर अनेक लहान- मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत रस्त्याची कामे रेंगाळत असल्यामुळे नागरिकांनी व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलने केली. परंतु याची दखल शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेत नसल्यामुळे पुढील आंदोलन अधिक आक्रमक होऊ शकते, हे लक्षात येताच आमदार प्रकाश भारसाकळे यांनी काल विश्रामगृह तेल्हारा येथे बैठक घेतली.

रस्त्यांबाबत ज्या लोकांनी पुढाकार घेऊन आंदोलने केली त्यांना बोलावून विस्तृत चर्चा केली. यादरम्यान नागरिक व आमदारांमध्ये खडाजंगीसुद्धा झाल्याचे पाहावयास मिळाले. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या सुधीर कंट्रक्शनचा ठेका रद्द झाल्याचे सांगून यापुढे नवीन निविदा राबविली जाईल व त्या माध्यमातून लवकरात लवकर कामे करून घेतली जातील, अशी माहिती दिली. निविदा प्रक्रिया काढण्यात वेळ झाला तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालणे योग्य एका बाजूचा रस्ता करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार विशाल नांदोकार यांच्या आंदोलनाच्या वेळी मी येऊ शकलो नाही, अशी कबुली आमदारांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी लोटांगण आंदोलन केले होते. त्यांना सहकार्य म्हणून शिवसेना उपतालुका प्रमुख अजय गावंडे, काँग्रेसचे संदीप खारोडे, पत्रकार संदीप सोळंके व विशाल नांदोकार यांनी लोटांगण घेऊन सहभाग घेतला होता. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते. तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदारांवर प्रश्नांचा भडीमार

तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. या भागाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांनी सुरुवातीपासून पुढाकार घेणे आवश्यक होते. आम्ही आमच्या मागण्या मांडाव्या तरी कुणापुढे या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा भडिमार जनआंदोलन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष ॲड. पवन शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू मालिये व तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामा फाटकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT