Sandipan Bhumre, Abdul Sattar And Atul Save Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar: औरंगाबाद जिल्हा बँकेत शिवसेनेला थोपवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी; तीन संचालक गळाला लावत अतुल सावेंनी टाकला मोठा डाव

Aurangabad District Central Cooperative Bank, BJP vs Shiv Sena, Bank President Election: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी व अपक्ष संचालकांच्या पाठिंब्यामुळे भाजपाने संख्या बळ वाढवत अध्यक्षपदाच्या शर्यतीत जोरदार दावा केला.

Jagdish Pansare

BJP vs Shiv Sena: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. नऊ संचालक निवडून आल्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व एक अपक्ष अशा तीन संचालकांना आपल्या बाजूने खेचत शिवसेनेच्या संख्या बळाची बरोबरी केली आहे.

भाजपाने हा डाव टाकल्यामुळे आता अध्यक्षपदासाठी शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २० संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महा युतीने सात संचालक आधीच बिनविरोध निवडून आणले आहेत तर अपक्ष अनिल बोरसे हे देखील बिनविरोध संचालक झाले होते. त्यानंतर बारा संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

महाविकास आघाडीचे पॅनल मैदानात उतरवले गेले मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी अचानकपणे महायुतीच्या पॅनल कडून लढण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली. याचा परिणाम महाविकास आघाडी प्रणित पॅनलचे पानीपत होण्यात झाला. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे वगळता महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार पराभूत झाले.

बिनविरोध निवड झालेल्या संचालकांपैकी अपक्ष अनिल बोरसे आणि महायुतीच्या पॅनलमधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन संचालक काल भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. अर्जुन पाटील, सुवर्णा जाधव आणि अपक्ष अनिल बोरसे या तीनही संचालकांनी भाजपाला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. यापैकी अनिल बोरसे यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी महायुतीसोबत जाण्याचा आपण निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

तीन संचालक गळाला लागल्यामुळे भाजपाच्या संचालकांची संख्या सात अधिक तीन अशी एकूण दहा होते. अर्थात एकट्या शिवसेनेचे नऊ संचालक असल्यामुळे हा पक्ष जिल्हा बँकेत मोठा भाऊ ठरला आहे. मात्र तीन संचालक भाजपाच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आता अध्यक्षपदाच्या रेसमध्ये भाजप हिरीरीने उतरणार हे मात्र निश्चित आहे.

शिवसेनेमध्ये अध्यक्षपदावरून आमदार अब्दुल सत्तार व खासदार संदिपान भुमरे यांच्यात स्पर्धा असल्याचे बोलले जाते. या दोन नेत्यांमध्ये समेट घडली नाही तर भाजप अध्यक्षपदावर दावा करणार हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीच्या दोन आणि एका अपक्ष संचालकांच्या उपस्थितिने मंत्री अतुल सावे यांनी एक प्रकारे भाजपाचा स्वबळावर अध्यक्ष होऊ शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.

भाजपाने टाकलेल्या या डावाला शिवसेनेचे नेते आता कसे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाचा जिल्हा परिषद व महापालिकेतील अनुभव पाहता आमदार अब्दुल सत्तार यांनी आपली स्वतंत्र खेळी सुरू केल्याचीही चर्चा जिल्हा बँकेचे राजकारणात सुरू आहे. खासदार संदिपान भुमरे यांची समजूत काढण्यात सत्तार यशस्वी झाले तर अंबादास दानवे आणि कल्याण काळे यांच्या पाठिंब्यावर सत्तार मुलासाठी अध्यक्षपद खेचून आणू शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा शेतकरी असला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे, ती सत्तार यांच्यासाठी काहीशी अडचणीची ठरू शकते. परंतु सत्तार आणि दानवे यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भेटीगाठी आणि मुंबईत झालेली खलबते पाहता अंबादास दानवे यांची भूमिका अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.

महाविकास आघाडीकडून एकमेव निवडून आलेले संचालक खासदार कल्याण काळे यांची आणि आमदार अब्दुल सत्तार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे यांच्या विजयात अब्दुल सत्तार यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्या सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातून कल्याण काळे यांना सत्तार यांनी मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. याची परत फेड काळे हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांना पाठिंबा देऊन करू शकतात असेही बोलले जाते. एकूणच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड रंजक ठरणार असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT