Sanjay Shirsat Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका!

Sanjay Shirsat : तातडीने औरंगाबादमधून एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येत आहे. शिरसाटांना तातडीने औरंगाबादमधून एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने मुंबईला रवाना करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सोमवारी दुपारच्या दरम्यान त्यांना त्रास जाणवत होता. औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयातही त्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील सुरू करण्यात आले होते. मात्र आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांची लिलावतीमध्ये भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रक्तदाबाचाही त्रास :

याबाबत सरकारनामा प्रतिनिधीने शिरसाट यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात शिरसाट यांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. तसेच, शिरसाट यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली.

सध्या प्रकृती ठीक :

शिरसाट यांच्या स्वीय सहायकाने सांगितले की, हृदयविकाराचा झटका नसून छातीत त्रास होत असल्याने मुंबईला दाखल करण्यात आले आहे. तसेच अँजिओग्राफीनंतर संजय शिरसाट यांनी देखील मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आज सकाळी एअर अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात संजय शिरसाट यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. तसेच, संजय शिरसाट यांची तब्येत आता बरी असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. पश्चिम औरंगाबाद मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत संजय शिरसाट गेले होते.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात शिरसाटांचा विचार झाला नसल्याने, संजय शिरसाट यांनी उघडपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना विचारात घेतले जाईल, असे त्यांना शिंदेकडून आश्वासन दिले असल्याचेही बोलले जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT