Health Minister Rajesh Tope Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

भरती प्रक्रियेची जबाबदारी पुन्हा न्यासाला, टोपे म्हणतात आमचा संबंध नाही..

(Health Minister Rajesh Tope)परीक्षा पुढे ढकलल्या नसत्या तर हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते, ते परीक्षेला मुकले असते

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः रद्द करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील भरती परीक्षांच्या तारखांबाबत उद्या निर्णय होणार आहे. साधरणतः १५,१६ किंवा २२, २३ आॅक्टोबरला या परीक्षा होऊ शकतात, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादेत दिली. मात्र, ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली, लाखो परीक्षार्थींचे नुकसान झाले, त्याच न्यासा या खाजगी कंपनीवर परिक्षेची जबादारी सोपवण्यात आली आहे.

परिक्षा घेण्याचे काम संबंधित कंपनीचे असते, राज्य सरकार फक्त त्यांना प्रश्नपत्रिका पुरवते, असे सांगत टोपे यांनी या संदर्भात हात झटकले आहेत. त्यामुळे परिक्षेपूर्वीच गोंधळ घालणाऱ्या न्यासा कंपनीकडेच आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी 'न्यासा' या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन बसली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या.

या निर्णयाबद्दल परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असले तरी आरोग्यमंत्र्यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. परीक्षा पुढे ढकलल्या नसत्या तर हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते, ते परीक्षेला मुकले असते असा दावा, टोपे यांनी केला. औरंगाबादेत ते पत्रकारांशी बोलत होते.

आता परीक्षा कधी घेणार यावर टोपे म्हणाले, आॅक्टोबरमधील १५ , १६ किंवा २२,२३ आॅक्टोबरला या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. दरम्यान, रेल्वे विभागाची परीक्षा आहे, ती त्यांनी पुढे ढकलली तर सर्वानुमते सांगितलेल्या तारखांना परीक्षा होऊ शकतील.

ज्या न्यासा खाजगी कंपनीमुळे राज्य सरकारवर परीक्षा रद्द करण्याची वेळ आली, लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्याच कंपनीला पुन्हा परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असतांना न्यासाचीच पुन्हा निवड का? यावरही टोपेंनी उत्तर दिले.

त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचे टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या तारखांची उद्या घोषणा केली जाणार आहे, त्यासाठी उद्या ११ वाजता मुंबईत बैठक होणार असून आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित असणार आहेत. तारखांबाबत माझी आणि आरोग्य सचिवांशी बोलणे झाले आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करून त्यानंतर तारखांची निश्चिती करून घोषणा करण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.

दहा दिवस आधी हाॅल तिकीट..

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्या नसत्या तर मोठ्या प्रमणावर विद्यार्थी परीक्षेला मुकले असते. हाॅल तिकीट, सेंटर बाबत झालेला घोळ दूर करण्यासाठी संबंधित कंपनीला वेळ देणे गरजेचे होते, त्यामुळे परीक्षा रद्द नाही, तर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.

आधी झालेल्या चुका पुन्हा होऊ नये, विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेची पुढील तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दहा दिवस आधीच हाॅल तिकीट देण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT