Hari Narke, Devendra Fadnavis
Hari Narke, Devendra Fadnavis sarkarnama
ब्लॉग

`हे दक्षिणायन संपणार आहे, अंधार हटणार आहे!`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी या सत्ता नाट्यावरुन भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.

राज्यामध्ये होत असलेल्या घडामोडींवर नरके यांनी नाराजी आणि चीड व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या सत्ताबदलावर हल्लाबोल चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये नरके म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तो देताना ते किती संयमाने आणि कळकळीने बोलले. कोणीही मागितलेला नसताना त्यांनी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला. त्यांना आमदारकी सोडा असे कुणीही म्हणाले नव्हते.

कोरोना काळात २ वर्षे ७ महिने २ दिवस उद्धवजींसारखा सुसंस्कृत, कुटुंबवत्सल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता. म्हणूनच महाराष्ट्र आजही सुरक्षित आहे. उद्धव ठाकरे नसते तर मराठी जनता सैरभैर होऊन मदतीसाठी बेवारस स्थितीत हाती कटोरा घेऊन फिरत राहिली असती, असेही ते म्हणाले.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सलग साडेतीन तास युक्तीवाद ऐकला. न्यायालयाची विनोदबुद्धी तल्लख असल्याने आमदारांची अपात्रता आणि विश्वास ठराव यांचा संबंधच काय असा प्रश्न विचारला गेला. आमदारांना नोटीसीला उत्तर द्यायला ४८ तास अपुरे असल्याने ती मुदत ११ जुलैपर्यंत वाढवून देणाऱ्या न्यायालयाने २८८ आमदारांना ताबडतोब मुंबईत येऊन विश्वास मत द्यायला मात्र २४ तासांचा अवधी पुरेसा ठरवला.

केंद्र सरकारचे अॅटर्नी / सॉलिसिटर जनरल राज्यपालांची बाजू मांडताना राज्यशासन व विधानसभा उपाध्यक्ष यांच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करीत होते. तेव्हाच बलाढ्य केंद्र सरकार यात किती खोलवर गुंतलेय ते स्पष्ट झाले, असेही नरके म्हणाले. कबूल केलेला शब्द पाळला नाही म्हणून संपूर्ण पक्ष एकमताने आघाडीत जातो तो जनादेशाचा अपमान असतो. मात्र, तोच पक्ष इडीच्या दहशतीने फोडणे, सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे, कोट्यवधी रुपयांच्या थैल्या देऊन घोडेबाजार करणे, पक्षांतर बंदी कायदा मोडून पक्ष फोडणे हे सारे करून सत्तेत येणारे साधनसुचितावाले नी जनादेशाचा सन्मान करणारे असतात, असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे.

याला लोकशाही म्हणतात? विरोधकांचे फोन टॅप केले म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. इथे पेगासिसचे लायसन्स घेऊन, विरोधकांना माफिया दाखवून, त्यांची खोटी नावे फाईलवर लिहून फोन टॅप केले जातात हे मात्र लोकशाहीचा सन्मान करणारे होते? लढेंगे और जितेंगे भी! ही रात्र सव्वा दोन वर्षांची असेल. तरी हे दक्षिणायन संपणार आहे. अंधार हटणार आहे. कारण याच्यामागे ना सत्य आहे ना साधनसुचिता ना लोकशाही मूल्ये, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT