Maharashtra CM Eknath Shinde Birthday Sarkarnama
ब्लॉग

CM Eknath Shinde Birthday : ऑटोरिक्षा चालक ते मुख्यमंत्री : गोष्ट शिवसेनेच्या एका वाघाची

Pankaj Rodekar

Political : 80 च्या दशकाला प्रारंभ झाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा सूर्य महाराष्ट्राच्या राजकारणात तळपू लागला होता. त्या तळपत्या सूर्याच्या अग्नीत आनंद दिघे या नावाचा अक्षरशः एक निखारा ठाणे जिल्ह्यात धगधगत होता. एकाच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली ओठांवर मिसरूड फुटणारी असंख्य मराठी तरुण पोरं ही मराठी माणसासाठी लढणाऱ्या 'शिवसेना' या चारअक्षरी नावाच्या संघटनेकडे ओढली जात होती. त्यातील एका पोराचं नाव होतं, एकनाथ संभाजी शिंदे! (Eknath Shinde).

घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीने शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या 16 वर्षीय त्यांनी रिक्षाचं हँडल हाती घेतलं होतं. रिक्षा चालवताना जसे गिअर टाकावे लागतात, तसेच समाजकार्यासह एकनाथ शिंदे यांनी राजकारणाचे पैलू अंगिकारत गिअरप्रमाणे एक एक टप्पा पार करत राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री अशी भरारी घेणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या शिवसैनिकाची ही कहाणी. (Maharashtra CM Eknath Shinde Birthday)

शिंदे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचदरम्यान ते कंपनीत कामाला जात असत. पण समाजसेवा त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत होती.

समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यातूनच 1984 मध्ये दिवंगत आनंद दिघे यांनी शिंदे यांच्या खांद्यावर किसननगर 3 या शाखेच्या शाखाप्रमुखाची जबाबदारी टाकली. शाखा हेच तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं ठिकाण झाल्यानं शिंदे यांचा लोकांशी संपर्क वाढला.

त्यातूनच दिघे यांनी टाकलेल्या विश्वासाला शिंदे यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. दिघे यांच्या तोंडून शब्द निघताच ती मोहीम फत्ते करण्यासाठी हा शिवसैनिक सदैव तयार असायचा. हळूहळू शिंदे हे दिघे यांच्या काही निकटवर्तीयांच्या माळेत जाऊन बसले होते. त्यातून 1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत नशीब आजमवण्याची संधी मिळाली आणि ते या निवडणुकीत विजयी झाले. नगरसेवक म्हणून त्यांनी ठाणे महापालिकेत प्रवेश केला. पुढे दिघे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना 2 जून 2000 रोजी शिंदे यांच्यावर अक्षरशः दुःखाचं डोंगर कोसळलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात शिंदे हे आपला 11 वर्षांचा मुलगा दीपेश आणि 7 वर्षांची मुलगी शुभदासोबत फिरायला गेले होते. त्यावेळी बोटिंग करत असताना भीषण अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा मुलगा व मुलगी पाण्यात बुडाले होते. त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी दिघे यांनी त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका सभागृहनेतेपदाची जबाबदारी टाकली. त्यांनी दिघे यांचा आदेश मानून काम करण्यास सुरुवात केली आणि येथून त्यांच्या राजकारणाचा खऱ्या अर्थाने गिअर पडला. याचदरम्यान 2001 ते 2004 या काळात त्यांनी सलग तीन वर्षे सभागृहनेता म्हणून यशस्वीपणे काम करताना केवळ स्वतःच्या वॉर्डापुरतं अथवा महापालिका हद्दीपुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला.

त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेत पडलेली मोठी पोकळी शिंदे यांनी भरून काढण्यास सुरुवात केली. 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून पहिल्यांदाच उमेदवारी दिली. या निवडणुकीत ठाणेकर नागरिकांनी त्यांना दिघे यांचे प्रतिबिंब म्हणून मोठ्या मताधिक्क्यानं निवडून दिलं. शिवसैनिक त्यांच्याकडे दुसरे दिघे म्हणून पाहू लागले. पुढच्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते.

याचदरम्यान शिंदे हे जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राहिले. पुढे 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्क्यानं विधानसभेत पाठवण्याचं काम केलं. 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवला.

ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलिस दलाचं आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढतं कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली.

मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं पोलिस दलाचं आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, हे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून सप्रमाण दाखवून दिलं.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. महिनाभरानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळं एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर विरोधी पक्षनेतेपदी होते. परंतु, अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. त्यावेळी राज्यातील काही भागांत दुष्काळ, तर काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं.

शिंदे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच त्यांची झालेली दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. परिणामी, सरकारला नुकसानभरपाई घोषित करावी लागली. त्यानंतर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाची खाती देण्यात आली. यामध्ये नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वन आणि पर्यावरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, आरोग्य या खात्यांचा समावेश होता.

ज्या ज्या जबाबदाऱ्या पडल्या त्या त्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडत शिंदे यांनी आपला ठसा उठवला. त्यातच त्यांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यात विविध योजना राबविल्या. कोविडच्या काळात ते स्वतः रस्त्यावर उतरून काम करत होते. तसेच कोविडबाधित आणि डॉक्टरांना धीर देण्यासाठी त्यांनी पीपीई किट परिधान करत डॉक्टरांसह रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं मोलाचं काम केलं. तसेच त्यांनी आरोग्यसेवा बळकट करण्यावरही तितकंच विशेष लक्ष देत त्यादृष्टीने धाडसी निर्णयही घेतले.

त्यातून ठाणे शासकीय जिल्हा रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी निधी कमी पडू दिला नाही. याचदरम्यान त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या काही आमदारांच्या मदतीने वेगळा गट तयार करून राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची किमया साधली. गेल्या दोन वर्षांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचं सरकार आल्यावर त्यांनी लोकोपयोगी निर्णय घेतलेच, त्याशिवाय विकासकामांचा धडाका लावला आहे. रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT