sarkarnama
ब्लॉग

शिवसेनेच्या ताकदीचा पुण्यात नक्की कोणाला फायदा होणार?

पुणे महापालिका (Pune Municipal Election) निवडणुकांचा तोंडावर शिवसेनेने (Shiv Sena) संपर्क प्रमुख बदलले. पुण्यातल्या सेनेचं रुपच पालटायला लागलंय.

सरकारनामा ब्युरो

- प्राची कुलकर्णी

पुणे : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात गेले काही दिवस शिवसेना ताकद वाढवताना दिसतेय. यासाठी शिवसेनेला थेट मुंबईतून रसद पुरवली जाते आहे. पुणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवून शिवसेना मुंबई महापालिकेची गणित मांडत असल्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. भाजपने ताब्यात घेतलेल्या पुण्यात आता या सेनेच्या प्रयत्नांचा नक्की कोणाला फायदा होणार हे मात्र महत्वाचं ठरणार आहे.

कार्यकर्त्यांचा प्रचंड गर्दीत होणारे मेळावे, पक्षातल्या दिग्गज नेत्यांचे दौरे, आणि त्यामुळे वाढत असलेला उत्साह गेल्या काही वर्षात पुणे शिवसेनेत अगदी अपवादानेच दिसणारं हे दृश्य. पण गेल्या काही दिवसांमध्ये मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. महापालिका (Pune Municipal Election) निवडणुकांचा तोंडावर शिवसेनेने (Shiv Sena) संपर्क प्रमुख बदलले. सचिन आहिर आणि आदित्य शिरोडकर यांची संपर्कप्रमुख आणि सहसंपर्क प्रमुखपदी वर्णी लागली. आणि पुण्यातल्या सेनेचं रुपच पालटायला लागलंय.

पक्षातल्या दिग्गज नेत्यांचे दौरे सातत्याने पुणे शहरात सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला थेट आव्हान देत खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या शहराध्यक्षांचा मतदारसंघ असणाऱ्या वडगावशेरी मध्ये सभा घेतली. मात्र पिंपरी आणि पुण्यातल्या कार्यक्रमात त्यांनी निशाणा साधला तो थेट अजित पवारांवर. महत्वाची बाब म्हणजे अगदी काहीच महिन्यापूर्वी खेड मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद पेटला होता आणि अगदी वरिष्ठ पातळीवरून हा वाद सोडवावा लागला होता. अर्थात तेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत असं सांगितलेल्या सेनेच्या नेत्यांनी थेट पुण्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संजय राऊत यांच्या पाठोपाठ बुधवारी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुण्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. आदित्य ठाकरे यांचा जिल्ह्यातील नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा थेट संवाद देखील पार पडला. या बैठकीमध्ये पुणे शहरातील पर्यावरणाशी संबंधित विषयांसोबतच नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला गेला. महत्वाचं म्हणजे या संवादात कोणत्याही इतर नेत्याची उपस्थिती नको असं देखील सांगण्यात आलं होतं. निवडणुक आघाडी म्हणूनच लढावी पण त्यात जागावाटपात कोणावर अन्याय होऊ देऊ नये, अशी भुमिका यावेळी नेत्यांनी मांडली. कॅाग्रेस कडून घेतल्या जात असलेल्या भुमिका लक्षात घेता राष्ट्रवादी बरोबरच आघाडी होईल असं गृहित धरत निम्म्या निम्म्या जागांची वाटणार केली जावी अशी भुमिका पुण्यातल्या सेना नेत्यांनी मांडली आहे.

आदित्य ठाकरेंचा दौरा महत्वाचा आहे. पण या दौऱ्या पाठोपाठ फक्त शहर पातळीवरच नाही तर जिल्ह्यात देखील सेनेकडून अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शिवसेनेतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा आठवडा ते पंधरा दिवसांमध्ये एक दौरा व्हावा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जावे याचा देखील प्रयत्न सेना करते आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांचा पातळीवर देखील चर्चा आणि संवाद करण्याचा सेनेचा विचार आहे.

अर्थातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात शिवसेना इतकी ताकद का वाढवते आहे असा सवाल या निम्मिताने उपस्थित होतो आहे. शिवसेनेचा एका वरिष्ठ नेत्याचा मते, "शिवसेना पक्षाला आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न पक्षाकडून सध्या सुरु आहे. अर्थात पुण्यात ताकद वाढवताना त्या बरोबरच या निमित्ताने आघाडीची गणितं देखील सोडवली जात आहेत. मुंबई महापालिका आणि पुणे महापालिका निवडणुकीची एकूण गणितं ठरवायला यावरून मदत होणार आहे. "

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT