Sarkarnama Podcast : Sarkarnama
ब्लॉग

Sarkarnama Podcast : बाळासाहेब...ठाकरी तोफ अन् शिवतीर्थ

अय्यूब कादरी

Sarkarnama Podcast : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... एक हात कमरेवर अन् दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ, तो हात उंचावत, सर्वत्र फिरवत, सबंध शिवतीर्थावरच्या लाखो शिवसैनिकांना भुरळ घालणारा, या गर्दीचा उत्साह शिगेला नेणारा अन् त्यांना क्षणात शांत बसवून विरोधकांवर शब्दांच्या फैरी झाडणारा हा पहाडी आवाज अन् शिवतीर्थ म्हणजेच, हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... अर्थात गेली दशकभर हा आवाज कोणाच्याच कानावर नाही, पण या आवाजाची जबरदस्त दहशत आजघडीला शिवतीर्थावर दिसतेच ! शिवसेना फुटली, दोन गट पडले, संघर्ष होऊ लागला तरीही बाळासाहेब, शिवतीर्थ, दसरा मेळावे हे समीकरण आजही लाखो लोकांना आपलेसे करते; तर काही जणांना धडकी भरवणारे ठरते. 

शिवतीर्थावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडधडायला लागली, की शिवसैनिकांना स्फुरण चढायचं आणि विरोधकांची मात्र बत्ती गुल व्हायची. खास ठाकरी शैलीत बाळासाहेब विरोधकांचा समाचार घेत असत. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची प्रतीक्षा जशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांना असायची तशी ती विरोधकांनाही असायची, मात्र विरोधकांची ती प्रतीक्षा त्यांच्या मनात धडकी भरवणारी  ठरायची. बाळासाहेब ठाकरे, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरणच बनलं होतं. दसरा मेळाव्याला बाळासाहेबांनी शिवतीर्थावरून डागलेल्या तोफगोळ्यांमुळे विरोधक अक्षरशः घायाळ होत असत. दसरा मेळावा हा अनेक ऐतिसाहिक घटनांचा साक्षीदार आहे.

आषाढीला विठुरायाच्या भेटीची ओढ वारकऱ्यांना लागलेली असते. कधी एकदा पंढरपूर गाठावे, अशी त्याची अवस्था झालेली असते. तशीच अवस्था शिवसैनिकांची दसरा मेळाव्याबाबत असते. वारकरी आषाढी वारी चुकवत नाहीत, त्याचप्रमाणे कट्टर शिवसैनिक दसरा मेळावा चुकणार नाही, याची काळजी घेतात. पूर्वी पक्षाकडून आतासारखी वाहनांची सोय केली जात नसे. मिळेल त्या वाहनातून ग्रामीण भागातील शिवसैनिक मुंबई गाठायचे आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणाचे साक्षीदार व्हायचे.

या मेळाव्यातून शिवसैनिकांना पुढील वर्षभरासाठीची ऊर्जा मिळत असे, धाराशिव जिल्ह्यातील कळंबचे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक अजिंत पिंगळे सांगतात. बाळासाहेबांचे विचार एेकणे म्हणजे एक पर्वणीच असायची. दसरा मेळाव्याला हमखास ही पर्वणी मिळायची. मी तुळजापुरातून तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन ती दसरा मेळाव्याला थेट व्यासपीठावर जाऊन बाळासाहेबांच्या हाती देत असे. आता येथे मिळणाऱ्या विचारांच्या ठिणग्या तुमच्या मतदारसंघात जाऊन पाडा, असे बाळासाहेब सांगायचे... शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले धाराशिवचे अनिल खोचरे सांगत होते. आता शिवसेनेचे दोन गट झाले, त्यामुळे दसरा मेळाव्याला पूर्वीसारखे वैभव नाही, याची खंतही खोचरे यांना आहे.

३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. त्याच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली होती. अपवाद वगळता शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. कोरोनात बंदिस्त सभागृहात दसरा मेळावा झाला. आता शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होतात. बाळासाहेबांच्या भाषणाला धार असायची. तशी धार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांना नसते. शिंदे यांचे भाषण अगदीच किरकोळ असते, त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सरस म्हणावे असे असते. 


शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कुठे होणार, तो कसा असेल याबाबत शिवसैनिकांसह उभ्या महाराष्ट्राला अतिशय उत्सुकता होती. असा मेळावा सर्वांसाठी नवीनच होता. शिवसेनेच्या मार्मिक या लोकप्रिय नियतकालिकातून दसरा मेळाव्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याचे ठिकाण होते शिवतीर्थ, अर्थात शिवाजी पार्क. शिवतीर्थावर बाळासाहेबांचे मोठे प्रेम होते. बाळासाहेबांचा जन्म  झालेल्या वर्षीच या मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्यात आले होते. 

पहिल्या दसरा मेळाव्याच्या स्थळाबाबतची लोकांची एक उत्सुकता शमली होती. पहिला दसरा मेळावा दसऱ्याच्या दिवशी झाला नव्हता. २३ ऑक्टोबर १९६६ अशी तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव दसरा मेळावा ३० ऑक्टोबरला घेण्यात आला. पहिल्या दसरा मेळाव्या बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा अत्यंत साधी होती. त्यांनी साधी पँट आणि शर्ट परिधान केला होता. या पहिल्या मेळाव्याला शिवाजी पार्कवर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली.  मेळाव्यात लोकांकडून स्टीलच्या डब्यात वर्गणी गोळा करण्यात आली होती. बाळासाहेबांनी टॅक्सीवर उभे राहून भाषण केले होते. 

त्यापूर्वी बाळासाहेबांनी मुंबईतील छोट्या चाळी, व्यायामशाळा अशा ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. अगदी दहा-वीस लोक असले तरी त्यांच्यासोबत बैठक घेऊन बाळासाहेबांनी भूमिका मांडली होती. शिवतीर्थावर मेळावा घेऊ नये, तितकी गर्दी जमेल की नाही, अशी शंका काही जणांनी बाळासाहेबांकडे व्यक्त करत बंदिस्त ठिकाणी मेळावा घेण्याची विनंती केली होती, मात्र बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांचा विश्वास खरा ठरला. मेळाव्याला मोठी गर्दी झाली. बंदोबस्तासाठी पोलिस नव्हते. बाळासाहेबांनी बैठका घेतलेल्या व्यायामशाळांतील तरुणांनी सुरक्षा पुरवली होती. याच व्यायामशाळांची पुढे शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यासाठी मोठी मदत मिळाली होती. दसरा मेळावा घेण्याचा निर्णय शिवसेनेसाठी पुढील काळात अत्यंत उपयुक्त ठरत गेला.

या मेळाव्यांतून वेळोवेळी शिवसेनेच्या राजकीय भूमिका जाहीर झाल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. बाळासाहेब या मेळाव्यांतून घणाघाती राजकीय भाषणे करायचे. त्यातून पुढील वर्षभरासाठी शिवसेना जोडून ठेवण्याचे काम होत असे. त्यानंतरच्या मेळाव्यांतही बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची मोठी गर्दी व्हायची. आधी शस्त्रपूजन, मग नेत्यांची भाषणे व्हायची. बाळासाहेबांचे भाषण सर्वात शेवटी होत असे. पक्षाची भूमिका यातून जाहीर केली जायची. मुंबईत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी १९९१ च्या दसरा मेळाव्यात जाहीर केली होती. भूमिका तर जाहीर केली, मात्र हा सामना रोखायचा कसा, याचे नियोजन नव्हते. शिवसेनेचे नेते प्रभाकर शिंदे आणि शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली. परिणामी, क्रिकेटचा सामना रद्द करावा लागला. अशा पद्धतीने बाळासाहेबांची घोषणा अमलात आली. दसरा मेळाव्यात पुढील रूपरेखा देण्याची परंपरा उद्धव ठाकरे यांनीही सुरू ठेवली आहे. 

दसरा मेळावा हा अनेक एेतिहासिक घटनांचा साक्षीदारही ठरला आहे. त्यामुळे शिवसेनेत या मेळाव्याला वेगळे महत्त्व आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सेनेची सुरुवात दसरा मेळाव्यात करण्यात आली. गिरणी कामगारांच्या संपाबाबत १९८२ मध्ये बाळासाहेबांनी भूमिका मांडली. दसरा मेळाव्याला अन्य पक्षांतील नेत्यांना निमंत्रित केलं जातं. या मेळाव्याला त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल शरद पवार आणि जॅार्ज फर्नांडिस यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बाळासाहेबांनी नातू आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देत राजकारणातील लाँचिंगही दसरा मेळाव्यालाच केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा पूर्णपणे आपल्या हाती घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांना वयोमानानुसार सभांना जाणं शक्य होत नव्हतं. २४ ऑक्टोबर २०१२ रोजी आयोजित दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहता आलं नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्या भाषणात बाळासाहेब हळवे झालेले दिसले. "तुम्ही मला इतकी वर्षे सांभाळलात, आता उद्धव आणि आदित्यलाही तसेच सांभाळून घ्या आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करा," असे आवाहन बाळासाहेबांनी २०१२ च्या दसरा मेळाव्यात केलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र असलेल्या बाळासाहेबांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचं निधन झालं. 

आतापर्यंत शिवसेनेच्या इतिहासात दोन वेळा दसरा मेळावा रद्द झाला. मुंबईत २००६ मध्ये जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. २००९ मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेमुळे दसरा मेळावा घेणे शक्य झालं नव्हतं. कोरोनाच्या काळात दोन वेळा बंदिस्त सभागृहात दसरा मेळावा घ्यावा लागला होता. 

दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांची भाषणे प्रचंड गाजली. ते विरोधकांचा खास ठाकरी शैलीत समाचार घ्यायचे. २०११ च्या मेळाव्यात बाळासाहेबांनी तत्कालीन केंद्र सरकार आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. केंद्र सरकार नपुंसक आहे असे म्हणत त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता. काँग्रेसने देशाचे डपिंग ग्राउंड केले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभरात आंदोलन सुरू असताना सोनियाबाई महिनाभर विदेशात गेल्या होत्या; कारण काय तर म्हणे, त्यांना शस्त्रक्रिया करून घ्यायची होती. अरे, आपल्या देशातील डॉक्टर मेले होते काय? आपल्याच डॉक्टरांवर तुमचा विश्वास नाही का? मलाही बायपास शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र देशातील डॉक्टरांवर माझा विश्वास होता, अशी टीका बाळासाहेबांनी केली होती. 

त्यावेळी भ्रष्टाचार, महागाईच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांनी दिल्लीत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या भोवतालच्या लोकांवर बाळासाहेबांनी टीकेची झोड उठवली होती. अण्णांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण त्यांचे सहकारी केजरीवाल, ती बाई... किरण बेदी जोशात होते. हातात माइक आला की केजरीवाल सारख्यांना जोर चढतो. भयंकर होते ते सगळे, पाहवत नव्हते. तिकडे अण्णा उपोषण करत होते आणि ‘रामलीला’वर दररोज ३५ हजार लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.

उपोषणाने भ्रष्टाचार संपणार नाही. तो संपवायचा असेल तर मर्दासारखी भूमिका घ्या. आपल्या सरकारच्या धोरणातच भ्रष्टाचार संपवण्याचा प्रामाणिकपणा नाही. नालायक लोक सत्तेवर आलेत. ते पंतप्रधान काय बोलतात हेच कळत नाही. लुंगीवाले अँटोनी संरक्षणमंत्री पदावर बसवलेत. तिकडे शत्रू आमच्या सीमेवर सज्ज झाला आहे आणि आमच्या सैनिकांकडे मात्र शस्त्रे नाहीत. शत्रूचा नाश करण्यासाठी आमच्या सैनिकांना बळ देण्याऐवजी हतबल केलं जातंय. असले लोक तुम्ही सत्तेत ठेवणार आहात काय?, अशा शब्दांत बाळासाहेबांनी सत्ताधाऱ्याचा खरपूस समाचार घेतला होता. त्यांची भाषणाची शैली आणि शब्दांची निवड शिवसैनिकांच्या हृदयाला थेट भिडणारी होती. बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यांत आपल्या खास ठाकरी शैलीत इंदिरा गांधी, शरद पवार यांचाही समाचार घेतला होता. 

बाळासाहेबांच्या निधनांतर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात मात्र अनपेक्षित प्रकार घडला होता. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर टीका केली होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेने मनोहर जोशी यांना राज्यसभेत पाठवले. मुदत संपल्यानंतर पक्षाने त्यांच्याएेवजी अनिल देसाई यांना संधी दिली. त्यानंतर मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. दक्षिण मध्य मुंबईएेवजी कल्याणमधून लढता येईल का, याची चाचपणी करण्यास पक्षाने त्यांना सांगितले. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेने राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे जोशी नाराज झाले. दादरच्या सार्वजनिक नवरात्र महोत्सवात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमेतवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे शिवसैनिकांत रोष निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव यांनी जोशींना टोला लगावला. 


आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होत आहेत. अर्थात दोघांचीही वक्तृत्वशैली बाळासाहेबांसारखी नाही. फुटीनंतरच्या पहिल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली होती. त्याची वक्तृत्वशैली बाळासाहेबांसारखी नसली तरी त्यांची स्वतःची एक शैली आहे. शिंदे यांचे भाषण मात्र अत्यंत रटाळ झाले होते. कुणीतरी लिहून दिलेले ते वाचताहेत की काय, अशी शंका निर्माण झाली होती. आता शिवसेना फुटीनंतरचा दुसरा दसरा मेळावा २४ ऑक्टोबरला होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT