Chhagan Bhujbal News : ट्रक ड्रायव्हर, पानटपरीवाला, चहा विकणारा, भाजी विकणारा, पंक्चर काढणारा इथपासून बड्या उद्योजकांसह अनेकांना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात आणलं..... त्यांना आमदार, खासदार अगदी मंत्रीही केलं.... पण, बाळासाहेबांच्या शब्दांवर, ताकदीवर अनेकांनी मोठं राजकारण उभं केलं आणि आपली छोटेखानी संस्थानंही थाटली.... पण राजकारणातलं वाढलेलं प्रस्थ आणि राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेल्या नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि पक्ष संघटनेसोबतच दोन हात करण्याचे धाडस दाखवले.
ज्यांना आपण मोठे केले त्यांनीच दगा दिला हे डोळ्यांदेखत घडत असताना बाळासाहेब ठाकरेंनीही अशा नेत्यांना धडा शिकवण्याची एकही संधी सोडली नाही. बाळासाहेबांचे बोट धरून मुंबई महापालिकेच्या महापौर पदापासून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदापासून उपमुख्यमंत्रिपद मिळावलेल्या आणि आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडात सहभागी झालेल्या छगन भुजबळांना बाळासाहेबांच्या आदेशावरून शिवसैनिकांनी अद्दल घडवली होती. या निमित्तानं गद्दारांना गाडण्यासाठी बाळासाहेबांनी अगदी दगडालाही उमेदवारी दिली तरी त्याला विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जंग जंग पछाडल्याचा इतिहास डोळ्यांसमोर येतो.
शिवसेनेतील महत्त्वाची सर्व पदं, मुंबईचे महापौरपद मिळूनही छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. याद्वारे त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं.... काही आमदारांनाही त्यांनी सोबत नेलं होतं. भुजबळांची ही कृती बाळासाहेबांसह शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली होती. शिवसैनिक संधीच्या शोधात होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी चालून आली होती. मंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्यासारख्या शिवसेनेच्या अगदी नवख्या उमेदवाराला विजयी करून शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव केला होता. शिवसैनिक गद्दारी सहन करू शकत नाहीत, असा संदेश त्याद्वारे देण्यात आला होता.
उपेक्षित, रस्त्यावरच्या अनेक तरुणांना उचलून बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात मोठं केलं. आमदार, खासदार, अगदी मंत्रीही केलं. सत्तेची पदे भोगून बाहेर पडलेल्यांना मात्र शिवसेना आणि शिवसैनिकांनी जबर धडा शिकवला. शिवसेनेच्या भाषेत अशा लोकांना गद्दार असं संबोधलं जातं..... अशांना धडा शिकवण्यासाठी मग पक्षानं अगदी दगडालाही उमेदवारी दिली तरी त्याला विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जंगजंग पछाडल्याचं दिसतं.....
यापूर्वी उपमुख्यमंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपदं भूषवत सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) स्थिरावलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनाही शिवसैनिकांनी असाच धडा शिकवला होता. राजकारणात नवख्या असलेल्या तरण्याबांड बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर १९९५ मध्ये छगन भुजबळ यांचा मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर राज्यभरात नांदगावकरांची प्रतिमा जायंट किलर अशी झाली. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंनी शाखाप्रमुख, मुंबईचं महापौरपदही दिलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना विरोध केल्याचं कारण पुढं करून भुजबळ १९९१ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ आमदार बाहेर पडले. त्यापैकी सहा शिवसेनेत परत आले आणि त्यातील तिघे पुन्हा छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृष्णराव इंगळे वगळता छगन भुजबळांसह सर्वांनाच पुढील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता छगन भुजबळ यांचे पक्षांतराचे एक चक्र पूर्ण झाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडले. शरद पवारांशी इमान असल्याचे दाखवणाऱ्या भुजबळांनी त्यांना सोडून आता अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलाय....
गद्दारीची शिवसैनिकांना प्रचंड चीड आहे. याचा फटका भुजबळ यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही सहन करावा लागलाय. पक्षांतर करणाऱ्यांबाबत शिवसेनेचा मतदार आणि कायर्कर्त्यांमध्ये जशी भावना असते तशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे किंवा नाही हे आगामी निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भुजबळ यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं.... ते लहान असतानाच्या त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं.... त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा मुंबई येथे सांभाळ केला. ते माझगाव येथील पत्राचाळीत वाढले. उदरनिर्वासाठी ते भायखळा येथील भाजीमंडईत भाजीपाला विकू लागले. गुंडगिरीमुळे तिथंही त्यांचा फार काळ निभाव लागला नाही. नंतर ते फूटपाथवर भाजी विकू लागले. हे करत असताना त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं होतं,.... दहावीनंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. सामाजिक, राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाल्यामुळे नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
१९७०-८० च्या दशकात मुंबईत शिवसेनेची चलती होती. केडर बेस पक्ष असल्यामुळे शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचा प्रचंड दरारा असायचा. अशाचवेळी ते शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. हे सर्व सांगण्याचं तात्पर्य असं की, शिवसेनेने सामान्य परिस्थितीतून आलेल्या भुजबळांसारख्या अनेक तरुणांना संधी दिली. काँग्रेसमध्ये असलेल्या प्रस्थापितांच्या चलतीमुळे तिकडे सामान्य तरुणांना फारसा वाव मिळायचा नाही.
डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही भुजबळ शिवसेनेत सक्रिय राहिले. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा पगडा होता. १९७३ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यानंतर पक्षात त्यांचे राजकीय वजन आणखी वाढलं. शिवसेनेच्या लढवय्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
ओघवतं वर्क्तृत्व, धडाडीची कार्यशैली आणि मोठ्या जनसंपर्कामुळे ते लोकप्रिय झाले. ते थेट बाळासाहेबांच्या संपर्कात राहू लागले. मनोहर जोशी, सुधीर जोशी, अ.ड. लीलाधर डाके, सतीश प्रधान यांच्या बरोबरीने त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. मुंबई महापालिकेत ते विरोधी पक्षनेते राहिले. १९८५ मध्ये शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली आणि महापौरपदाची माळ भुजबळांच्या गळ्यात पडली. माझगाव मतदारसंघातून ते पुढे शिवसेनेचे आमदारही झाले. एखाद्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला यापेक्षा आणखी काय द्यायचे असते?
मग प्रश्न निर्माण होतो, की बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या भुजबळांनी शिवसेना का सोडली? भुजबळ हे अत्यंत विपरित परिस्थितीतून स्वकर्तृत्वावर पुढं आले होते. शिवसेनेनेही मोठी संधी दिली. मात्र, महत्त्वाकांक्षा नसेल तर राजकारण तरी पुढे कसं सरकरणार?.... यातूनच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवाचा अध्याय लिहिला गेला.
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी देशातील ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. याला भाजप-शिवसेनेचा विरोध होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या या शिफारशी लागू केल्या. असं करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलं.... शिवसेना-भाजपने याला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे भुजबळ यांचे बाळासाहेब ठाकरेंशी मतभेद निर्माण झाले. त्यामुळे भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार फोडून भुजबळांनी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच आव्हान दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये रुजली.
भुजबळांचं हे पाऊल शिवसैनिकांना अजिबात आवडणारं नव्हतं. त्यातूनच भुजबळांवर हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता. पुढे १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक लागली. शिवसैनिक संधीच्या शोधातच होते. माझगाव मतदारसंघातून बाळासाहेबांनी अत्यंत नवख्या अशा बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. तसं पाहिलं तर नांदगावकर हे भुजबळ यांच्यासमोर अत्यंत कमकुवत होते. मात्र, भुजबळांनी शिवसेनेच्या भाषेतील गद्दारी केली होती आणि शिवसैनिक गद्दारांना कधीही माफ करत नाहीत, याची प्रचिती निवडणूक निकालात आली. यापूर्वी याच मतदारसंघातून निवडून आलेल्या भुजबळांचा पराभव झाला, नांदगावकर विजयी झाले. भुजबळांना पराभूत करणे सोपं नव्हतं......यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान केलं होतं.
१९९० मध्ये विधानसेभेचे विरोधी पक्षनेते म्हणून मनोहर जोशी यांची निवड होती. विरोधी पक्षनेतेपदावर भुजबळ यांची नजर होती. भुजबळांनी घेतलेल्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयाची बीजं तिथंच रोवली गेली होती. बाळासाहेबांनी मंडल आयोगाला विरोध केला हे तात्कालिक आणि वरवरचं कारण होते. याची कल्पना बाळासाहेब आणि शिवसैनिकांना होती. त्यामुळे भुजबळांच्या पराभवासाठी शिवसैनिक पेटून उठले होते. भुजबळांसोबत शिवसेना सोडलेल्या कृष्णराव इंगळे वगळता सर्वच आमदारांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.
१९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर कदाचित मुख्यमंत्रीही होऊ शकले असते. या पराभवानंतर त्यांनी कार्यक्षेत्र बदललं. त्यांनी आपला मोर्चा नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाकडे वळवला. तेथून सतत निवडून येत त्यांनी राजकारणात जम बसवला आहे. उपमुख्यमंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. समता परिषद स्थापन करून भुजबळांनी त्याचं काम देशपातळीवर नेत वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. तत्पूर्वी, २००४ मध्ये तेलगी प्रकरणात त्यांची मोठी बदनामी झाली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. हा घोटाळा आणि मनी लाँडरिंगच्या आरोपात त्यांना ईडीने १४ मार्च २०१६ रोजी अटक केली. अनेक महिने ते तुरुंगात राहिले. भाजपने राजकीय आकसापोटी ईडीचा वापर करून भुजबळांना अटक केली, असे आरोप त्यावेळी झाले होते.
आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत ते पुन्हा एकदा भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेत...... भाजप-शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला म्हणून शिवसेना सोडणारे भुजबळ पुन्हा एकदा त्याच पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे कारण कितपत खरे होते, याबाबत त्यामुळेच शंका निर्माण होते. राजकीय जाणकारांच्या मते, १९९० मध्ये विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळेच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते. शिवसेना सोडलेल्यांना कधी ना कधी पराभवाला सामोरे जावे लागले आहे किंवा त्यांची राजकीय कारकीर्द तरी संपलेली आहे. भुजबळ आज स्थिरावलेले वाटत असले तरी शिवसैनिकांनी दिलेला धडा ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत हे मात्रं खरं
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.