त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ छोटा राहिला, पण या अल्पकाळातही त्यांनी दूरगामी विचार करून निर्णय घेतले. विशेषतः राज्यभरात त्यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव कामं केली. अन्य क्षेत्रांतही त्यांनी भरीव कामं सुरू केली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना विरोधी पक्ष आणि त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या हाती एक प्रकरण लागलं. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची म्हणजे एमडीची परीक्षा दिलेल्या आपल्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. न्यायालयानंही तसा ठपका त्यांच्यावर ठेवला. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हे नेते म्हणजे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर. महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री म्हणून डॉ. निलंगेकर यांनी 3 जून 1985 रोजी शपथ घेतली होती. 6 मार्च 1986 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या वाट्याला केवळ नऊ महिने आले. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. बॕ. ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. महाराष्ट्र विधानभवनाचं रखडलेलं काम निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 1981 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. या सोहळ्यात इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राची ओळख असलेली 'इरकल' साडी परिधान केली होती.
शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झाला. ते अवघ्या पाच महिन्यांचे असताना त्यांचं पितृछत्र हरवलं. त्या काळातही त्यांच्या मातुश्री वत्सलाबाई यांना शिक्षणाचं महत्व कळलेलं होतं. त्यांनी मोठ्या जिद्दीने त्यांना शिक्षण दिलं. डॉ. निलंगेकरांचा जन्म झाला तो काळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रतिकूल व संवेदनशील होता. एका बाजूला ब्रिटिशांचं साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामाची दडपशाही, अशा प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मातुश्रींनी त्यांची जडणघडण केली.
डॉ. निलंगकेर यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून शासनानं त्यांचा गौरव केला होता. मात्र स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारं मानधन डॉ. निलंगेकर यांनी कधीही स्वीकारलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे वकिली सुरू केली. निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना 1945- 46 मध्ये पुढील शिक्षणासाठी गुलबर्ग्याला (आताचे कलबुरगी) पाठवण्यात आलं होतं. तेथील नूतन विद्यालयामध्ये शिक्षण सुरू असताना संघटनकौशल्य, संयम, शांत वृत्ती, चिकित्सक दृष्टीकोण आदी गुणांमुळे ते शिक्षकांचे लाडके बनले.
डॉ. निलंगेकर यांनी काळजी वाहू मुख्यमंत्री वगळता अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला. ते नऊ महिने आणि तीन दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिले. चारित्र्यसंपन्न नेता, अशी त्यांची ख्याती होती, मात्र वैद्यकीयच्या पदव्युत्तर परीक्षेत कन्या चंद्रकला डवले यांचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे या आरोपाचं गांभीर्य वाढलं. तो काळही संवेदनशीन होता. एखादा आरोप झाला, न्यायालयाने ठपका ठेवला की संबंधित नेते पदावरून तातडीने दूर होत असत. निलंगकेर यांनी कन्येचे गुण वाढवल्याचं प्रकरण न्यायलायात गेलं होतं. न्यायालयानं या प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे डॉ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. कालांतरानं या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली.
मुंबई विद्यापीठातर्फे एमडी (स्त्रीरोग आणि प्रसूती) परीक्षा घेण्यात आली होती. डॉ. निलंगेकर यांच्या कन्या चंद्रकला डवले यांनी ती परीक्षा दिली होती. यापूर्वी चंद्रकला यांनी तीनवेळा एमडीची परीक्षा दिली होती, मात्र त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. चंद्रकला यांनी चौथ्यांदा परीक्षा दिली त्यावेळी त्यांचे वडील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री (CM) होते. त्या प्रयत्नात चंद्रकला एमडी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. मात्र मुख्यमंत्री असलेल्या वडिलांनी पदाचा गैरवापर करून मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता. या आरोपामुळे निलंगेकरांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.
डॉ. निलंगेकर या प्रकरणात नंतर निर्दोष झाले असले तरी चारित्र्यसंपन्न नेता, अशा त्यांच्या ओळखीला काहीसा धक्का बसला होता. डॉ. निलंगेकर चारित्र्यसंपन्न तर होतेच, त्यांची पक्षनिष्ठाही वादातीत होती. पडझडीच्या काळातही त्यांनी पक्ष बदलला नव्हता. निलंगा विधानसभा मतदारसंघातून ते आठवेळा विजयी झाले होते. छत्रपती संभाजीनगर (आधीचं औरंगाबाद) येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची उभारणी करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी मिळवली होती. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळवणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले.
लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर डॉ. निलंगेकर यांची दीर्घकाळ पकड राहिली. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळे होत लातूर जिल्हा निर्मिती करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते असताना राज्यात अनेक मोठ्या सिंचन प्रकल्पांची उभारणी झाली. दुष्काळाच्या दुष्टचक्रात कायम अडकलेल्या मराठवाडा व विदर्भातील मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तेथे सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या.
काँग्रेसमध्ये 1974 नंतर महाराष्ट्रात दोन गट निर्माण झाले. एक वसंतदादा पाटील यांचा, तर दुसरा शंकरराव चव्हाण यांचा. त्यावेळच्या उस्मानाबाद (आताचं धाराशिव) जिल्ह्यात या दोन्ही गटांचे नेते होते. चव्हाण यांच्या गटात विलासराव देशमुख तर वसंतदादांच्या गटात शिवाजीराव पाटील निलंगेकर अशी विभागणी झालेली होती. देशात आणीबाणी लागू केल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं होतं. 1978 मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. पुलोद आघाडी स्थापन झाली, नंतर बरखास्तही झाली, अनेकांना पदं गमवावी लागली. महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. काही मातब्बर नेते काँग्रेस सोडू गेले. शिवाजीराव पाटील निलंगेकर मात्र गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वडिलांचे नाव भाऊराव पाटील. ते जमीनदार शेतकरी होते. त्या काळात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे शिवाजीराव पाटील हे घोड्यावर बसून गुलबर्ग्यावरून गावाकडे यायचे. त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण करून कायद्याचं (एलएलबी) शिक्षणही पूर्ण केलं होतं. 1948 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली होती. 17 ऑक्टोबर 1948 रोजी दादरला महाराष्ट्राचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. काँग्रेस पक्षाचे विद्यार्थीदशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला आहे.
निलंगकेर यांनी पहिली निवडणूक 1952 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कै. श्रीपतराव सोळुंके यांच्याविरुद्ध निलंगा विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्या निवडणुकीत सोळुंके यांनी निलंगेकरांचा पराभव केला होता. 1962 नंतर निलंगेकरानी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघावर पकड मजबूत ठेवली. ते इंदिरा गांधींचे निकटवर्तीय होते. गांधी घराण्याशी निकटचे संबंध असल्यामुळे त्यांची उपमंत्री म्हणून वर्णी लागली. नंतर ते राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्रीही बनले.
असं सांगितलं जातं की, मुख्यमंत्री बनल्यावर निलंगकेर यांनी कामांचा धडाका लावला होता. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत कोणत्या भागात काय समस्या आहेत याची पाहणी करून त्यावर काम सुरू केले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढीला लागली होती. परिणामी, त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधी पक्षांतील नेतेही सावध झाले होते. ते कुठं अडकतात का, यासाठी विरोधक टपूनच बसलेले होते. मात्र निलंगेकर हे कोणत्याही गैरव्यवहारात अडकत नव्हते. त्याच वेळी निलंगेकरांनी कन्येचे गुण वाढवल्याचं कथित प्रकरण त्यांच्या विरोधकांच्या हाती लागलं आणि गदारोळ सुरू झाला. न्यायालयानंही या प्रकरणात निलंगेकर यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
काँग्रेसचा शताब्दी सोहळा मुंबईत झाला तो निलंगेकर यांच्यामुळेच. हा सोहळा बेंगळुरूला व्हावा, असं काही नेत्यांचं मत होतं. काँग्रेसची स्थापना मुंबईत झालेली आहे, त्यामुळे शताब्दी सोहळाही मुंबईतच व्हावा, अशी भूमिका निलंगेकर यांनी घेतली होती. यासंदर्भात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक बोलावली होती. निलंगेकर यांची भूमिका मान्य करत राजीव गांधी यांनी काँग्रेसचा शताब्दी सोहळा मुंबईत घेण्यासाठी मान्यता दिली होती. राज्यातील काही विरोधी नेत्यांचाही हा सोहळा मुंबईत घेण्यास विरोध होता. मुंबई शहरावर ताण पडेल, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असं काही विरोधकांना वाटत होतं. निलंगेकर यांनी त्यांच्याशी बोलून अनेक बाबी पटवून दिल्या होत्या. त्यानंतर हा सोहळा मुंबईत होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मुख्यमंत्रिपद गेल्यानंतरही निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघावरील पकड ढिली होऊ दिली नव्हती. मात्र त्यांना घरातूनच आव्हान मिळत गेलं. त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर त्यांना आव्हान दिले. त्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव झाला. 2004 मध्येच त्यांच्या स्नुषा, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातुःश्री रूपाताई पाटील निलंगेकर या लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत डॉ. निलंगेकर यांनी नातू संभाजी यांचा पराभव केला.
डॉ. निलंगेकर यांनी 2009 नंतर निवडणूक लढवली नाही. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी काका अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. यादरम्यान डॉ. निलंगेकर हे वयोमानानुसार राजकारणात सक्रिय राहिले नाहीत. त्यांना 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मातही केली होती, मात्र त्यानंतरच्या गुंतागुंतीमुळे 5 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.