Manohar Parrikar : असेही मुख्यमंत्री जे टपरीवर चहा घ्यायचे, स्कूटरवरून फिरायचे...

Sarkarnama Podcast Manohar parrikar : गोव्याचे मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रिकर हे बहुतांश वेळा सुरक्षाव्यस्था सोबत घेत नसत. सामान्य माणसासारखा त्यांचा वावर असायचा.
Sarkarnama Podcast Manohar parrikar
Sarkarnama Podcast Manohar parrikarSarkarnama
Published on
Updated on

Manohar Parrikar Formar cm of Goa : मुख्यमंत्री स्कूरटवर फिरतात, सार्वजनिक ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था न घेता अगदी सामान्य माणसाप्रमाणे फिरतात... चित्रपट महोत्सवाला एखाद्या रसिकाप्रमाणे, सुरक्षा न घेता हजेरी लावतात... ते विमानात नेहमीच इकॉनॉमी क्लासमधूव प्रवास करतात! विश्वास बसत नाही ना? त्यामुळेच ते प्रचंड लोकप्रिय होते. तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते. होय, आपण मनोहर पर्रिकरांबद्दलच बोलतोय. गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. इतक्या साधेपणानं राहणारे हे मुख्यमंत्री आयआयटी मुंबईमध्ये शिकलेले होते.

एखाद्या भागात आमदार, खासदार, मंत्री येणार म्हटले तरी तगडा बंदोबस्त असतो. मुख्यमंत्री येणार असतील तर मग विचारायची सोयच नसते. मुख्यमंत्री तगड्या सुरक्षा व्यवस्थेच्या गराड्यात असतात. परिसराची कसून छाननी केली जाते. सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाता येत नाही. पण मनोहर पर्रिकर हे असे एक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यांचा वावर अगदी सामान्य माणसाप्रमाणे असायचा. सार्वजनिक ठिकाणीही ते कधी सुरक्षा घेत नसत. चार मित्र भेटले की ते जसं चहा घ्यायला टपरीवर जातात, त्याच पद्धतीने पर्रिकरांना टपरीवर चहा घेताना अनेकांनी अनेकदा पाहिलेलं आहे. 2020 मध्ये मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर यांनी अनेक वर्षं शासकीय निवासस्थानाचा वापर केला नव्हता. ते स्वतःच्याच घरी राहत असत. कार्यालयाला जाण्यासाठी ते अनेकदा शासकीय वाहनाचा वापर न करता त्यांची स्कूटर वापरत असत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ते नेहमीच वापर करायचे. त्यांच्या या सवयी गोव्यातील लोकांसाठी नव्या नव्हत्या. त्याचं कोणालाही आश्चर्य वाटत नसायचं. हाफ शर्ट, पँट आणि पायात चप्पल हे त्यांच्या साधेपणाचं प्रतीक बनून राहिलं होतं.

मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रिकर यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील मापुसा येथे झाला. मडगाव येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालं होतं. नंतर त्यांनी आयआयटी मुंबईतून पदवी प्राप्त केली. तरुणपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते. आयआयटीमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला, संघाचंही काम सुरू ठेवलं. महाराष्ट्र (Maharashtra) गोमांतकवादी पक्षाला टक्कर देण्यासाठी त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. 1994 मध्ये ते गोवा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. 1999 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. पर्रिकर हे 24 ऑक्टोबर 2000 रोजी पहिल्यांदाच गोव्याचे मुख्यमंत्री बनले. उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवरही गेले होते.

Sarkarnama Podcast Manohar parrikar
Manohar Joshi : दावा भाच्याचा, पण मामा झाले मुख्यमंत्री

त्यानंतर ते 2012 ते 2014 आणि 2017 ते 2019 पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. 2014 ते 2017 पर्यंत ते देशाचे संरक्षणमंत्री होते. संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते 2017 मध्ये पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते. निधनापर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. भाजप सत्तेत येणार, याची चाहूल लागली होती. पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी की नरेंद्र मोदी, यावर खल सुरू होता. त्याचदरम्यान 2013 मध्ये गोव्यात भाजपचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनीच मांडला होता.

पर्रिकरांना बडेजाव अजिबात आवडत नव्हता. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. मुख्यमंत्री असतानाही ते कोणत्याही सुरक्षेशिवाय स्कूटरवरून फिरायचे. यासह आयआयटीत शिकलेले पहिलेच आमदार बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या रूपानं गोव्यातील नेत्याला केंद्रात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. कर्करोग शेवटच्या टप्प्यात असतानाही एक वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्रिपद भूषवले होतं.

राजकीय नेत्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. पर्रिकर हेही त्याला अपवाद ठरले नाहीत. 29 जानेवारी 2005 रोजी भाजपच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे त्यांचं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यामुळं काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री बनले होते. 2007 ची विधानसभा निवडणूक भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसनं बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसचं नेतृत्व दिगंबर कामत यांनी केलं होतं.

पर्रिकर जसे साधे होते, लोकांमध्ये सहजपणे मिसळत होते, तसे दुसरीकडे त्यांना काही वादही चिकटले होते. ब्राझील येथे 2014 मध्ये आय़ोजित फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्यांनी सत्ताधारी भाजपचे तीन आमदार आणि तीन मंत्र्यांना पाठवलं होतं. फुटबॉल खेळाडू किंवा तज्ञांचा यात समावेश नव्हता. त्यामुळं त्यासाठी झालेल्या खर्चावरून काँग्रेसनं त्यांना लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री असताना 2001 मध्ये त्यांनी 51 प्राथिमक शाळा संघाशी संबंधित विद्या भारतीच्या ताब्यात दिल्या होत्या. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या काही विधानांवरही मोठी टीका झाली होती.

देशातील धार्मिक असहिष्णुतेबाबत अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना पर्रिकर यांनी अशा लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवायला पाहिजे, असं विधान केलं होतं. कथित राफेल घोटाळ्यावरूनही पर्रिकर वादात ओढले गेले होते. आमदार विश्वजित राणे यांचा एक ऑडियो व्हायरल झाला होता. राफेल विमानांच्या खरेदीची कागदपत्रं मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये आहेत, असं राणे कोणाला तरी सांगत आहेत, असा संवाद त्या ऑडिओ क्लिपमध्ये होता. काँग्रेसनं हे प्रकरण लावून धरलं होतं. पर्रिकर व्यवस्थित बोलत नाहीत, हुकूमशहाप्रमाणे वागतात, असा आरोप त्यांच्यावर केला जायचा. बडेजाव न मिरवणं, साधेपणानं राहणं, सुरक्षा न घेता कुठेही फिरणं, यामुळे त्या आरोपांवर पडदा पडत असे. त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप कधी झाले नाहीत.

गोव्यातील सरकारांना अस्थिरतेचा जणू शापच लागला होता. दर सहा महिने, वर्षाला सत्तांतरं व्हायची. ते 90 चं दशक असेल. या राजकीय अस्थैर्याला लोक कंटाळले होते. असे वातावरण असताना मनोहर पर्रिकर यांचा राजकारणात प्रवेश झाला. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या पर्रिकर यांचा गटबाजी, पक्षांतराच्या राजकारणात निभाव लागेल का, याबाबत त्यावेळी लोकांच्या मनात शंकाच होती. नंतर ती शंका खोटी ठरत गेली. संघाच्या विचारसरणीचे अनुकरण करणारे पर्रिकर मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. गोव्यात ख्रिश्चनांची संख्या अधिक आहे. या समाजालाही पर्रिकर यांनी आपलसं करून घेतलं होतं.

Sarkarnama Podcast Manohar parrikar
Vilasrao Deshmukh : स्वतंत्र खोलीसाठी वाद, धोतरासह आमदार उतरले स्वीमिंग पूलमध्ये

आयुष्यातील अखेरची दहा वर्षं मला स्वतःसाठी जगायची आहेत, असे पर्रिकर एकदा बोलले होते. मात्र त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांना केंद्रात जावं लागलं. संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते 2017 मध्ये गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी ते कर्करोगाने ग्रस्त होते. तशाही अवस्थेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले, दररोज कार्यालयात गेले.

आयाआयटीमधून पदवी प्राप्त केल्यानंतर पर्रिकर यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला होता. संघाशी तर ते जोडले गेलेलेच होते. महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष (एमजीपी) गोव्यात मजबूत स्थितीत होता. 1980 चे ते दशक होते. भाजपची सत्ता कशी येऊ शकेल, यावर भाजपमध्ये खल सुरू झाला होता. त्यातूनच भाजपनं संघाकडे काही नेत्यांची मागणी केली होती. संघानं मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पारसेकर यांना भाजपमध्ये पाठवलं. तथापि, पारसेकर यांचे कुटुंबीय एमजीपीचे कट्टर समर्थक होते, मात्र त्यांनी वेगळी वाट निवडली.

गोवा विधानसभेच्या 1989 मधील निवडणुकीत भाजपला एक टक्क्यापेक्षाही कमी मतं मिळाली होती. त्यानंतर पर्रिकर यांच्या संघटनकौशल्याची परीक्षा सुरू झाली. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मांडवी नदीतील कॅसिनोच्या मुद्द्यावरून दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जेरीस आणलं होतं. भाजपला सत्तेत आणण्यात पर्रिकर यांचा सिंहाचा वाटा राहिला. पर्रिकर मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे प्रशानतही अनेक सुधारणा होत गेल्या. रस्ते, वीजपुरवठ्याच्या कांमांसह त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आणि गोव्यात भाजपचा पाया पक्का होत गेला. तो आजही तसाच आहे. 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रिकर यांचं वयाच्या अवघ्या 63 व्या वर्षी निधन झालं.

मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचं 2000 मध्ये निधन झालं होतं. त्यांना दोन मुलगे आहेत, उत्पल आणि अभिजित. वडिलांच्या निधनांनंतर त्यांच्या पणजी या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा उत्पल यांना होती. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उमेदवारी देताना भाजपनं उत्पल पर्रिकर यांना डावललं. मनोहर पर्रिकर यांचे पक्षांतर्गत विरोधक बाबूश मोन्सेराटे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले उत्पल पर्रिकर भाजपमधून बाहेर पडले. त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून 2022 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.

Sarkarnama Podcast Manohar parrikar
Rajya Sabha by Election : राज्यसभा निवडणुकीत एनडीए की इंडिया, कुणाचं पारडं जड? असं आहे विजयाचं गणित...

असं सांगितलं जातं, की भाजपनं उत्पल पर्रिकर यांना अन्य दोन मतदारसंघांतून लढण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र ते वडिलांच्या पणजी या मतदारसंघातूनच उमेदवारीसाठी आग्रही होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. शिवसेनेही उत्पल यांना ऑफर दिली होती, मात्र हे दोन्ही प्रस्ताव त्यांनी नाकारले होते. गोव्यात भाजपचा पाया पक्का करणाऱ्या मनोहर पर्रिकर यांची दोन्ही मुलं आता भाजपपासून दूर आहेत. त्यांनी मनात आणलं असतं तर हयात असताना दोन्ही मुलांना आमदार, खासदार बनवू शकले असते, मात्र त्यांनी तसं केलं नाही. आपल्या मुलांना राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी नको त्या उठाठेवी, खटाटोप करणारे राजकीय नेते पावलोपावली आढळून येतात. या आघाडीवरही मनोहर पर्रिकर यांचं वेगळेपण ठळकपणे जाणवल्याशिवाय राहत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com