Anil Babar Sarkarnama
ब्लॉग

Anil Babar : 'टेंभूच्या स्वप्नपूर्ती'चे जनक ते सुरक्षा नाकारणारे... आमदार अनिल बाबर

सरकारनामा ब्यूरो

- शहाजी डोंगरे

Sangli News : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या टेंभू या आशिया खंडातील सर्वात मोठ्या जलसिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली. बघता बघता दुष्काळी असलेल्या कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यात पाण्याचे आगमन होऊन नव्या हरितपर्वाला सुरुवात झाली.

दुष्काळी उजाड आणि ओसाड माळरानावर 'नंदनवन' करण्यात जलनायक आणि टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल बाबर यांनी ही योजना सत्यात उतरविली आणि स्वप्नपूर्ती होऊन बळीराजा सुखावला. मात्र अनिलभाऊंच्या अचानक जाण्याने दुष्काळी जनतेच्या डोळ्यातील पाणी थांबणे अशक्य आहे. दुष्काळी भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू करण्यासाठी खानापूर तालुक्यातील गार्डी गावच्या तरुणाचे नेतृत्व उदयास आले.

तेच उमदे नेतृत्व म्हणजे आमदार अनिलभाऊ बाबर, कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंचपदापासून ते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतीपासून थेट विधानसभा सभागृहातील लक्षवेधी आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते आमदार अनिलभाऊ बाबर. खानापूर मतदारसंघातील दुष्काळ संपविण्याची जिद्द उराशी बाळगून अनिलभाऊंनी विधानसभेच्या सभागृहात प्रवेश केला.

आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा विडा त्यांनी उचलला. त्याच पार्श्वभूमीवर काम करीत असताना मतदारसंघाच्या पहिल्या विटा शहरापासून सुमारे 50 ते 60 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णा नदीतून दुष्काळी खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्याला पाणी देण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यातूनच टेंभू योजनेचा जन्म झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अनिलभाऊंनी दूरदृष्टीने ही संकल्पना आत्मसात केली. ही योजनाच माझ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रव्युहातून बाहेर काढेल, असे ध्येय बाळगून त्यांनी शासन-दरबारी पाठपुरावा सुरू केला. आमदार असताना आणि नसतानाही त्यांनी टेंभूबाबत केलेला पाठपुरावा आणि टेंभू योजनेला गती मिळावी, यासाठी विटा तहसील कार्यालयासमोर केलेले आमरण उपोषण जनता आजही विसरलेली नाही.

खानापूर मतदारसंघाचा दुष्काळ संपविण्यासाठी उदयास आलेल्या टेंभू योजनेचे काम सुरू झाले. सुरुवातीला कमी बजेट होणारी ही जलसिंचन योजना कालांतराने अशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाऊ लागली. शासनस्तरावरील निधी उपलब्धतेबाबतच्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागला. तरीही आमदार अनिलभाऊंनी आपला पाठपुरावा सोडला नाही.

विधानसभा सभागृहात याबाबत लक्षवेधी सूचना मांडून प्रसंगी आपल्याच सत्तेतील सरकारला धारेवर धरून अनिलभाऊंनी वेळोवेळी निधीची उपलब्धता करून घेतली. त्यामुळेच आज टेंभू योजना लाभक्षेत्रातील वंचित गावे वगळता दुष्काळी खानापूर मतदारसंघात दाखल झाली आहे. मंत्रिपदापेक्षा मला माझ्या मतदारसंघातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, हे ध्येय बाळगून त्यांनी केले.

त्यामुळे एखाद्या कामाचा जनतेसाठी पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. टेंभूसाठी सातत्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी योजनेच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी असलेल्या अनिलभाऊंसमोर अधिकाऱ्यांचीही बोलती बंद होत होती.

त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आज दुष्काळी खानापूर मतदारसंघात कृष्णामाई शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली आहे. एकेकाळी केवळ रब्बी पिके घेणाऱ्या खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये आज टेंभूच्या पाण्यामुळे जलक्रांती झाली आहे. त्यांच्यामुळेच या खानापूर मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्यातील शिवार आज हिरवेगार झाले आहे. त्यांच्या या कामाला खानापूर मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही.

सुरक्षा नाकारणारे आमदार

राज्यात मागील दीड वर्षात ज्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यानंतर केंद्र व राज्य दोघांकडून आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाला, परंतु अनिल बाबर व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वप्रकारे मिळणारी सुरक्षा नाकारली. या संवेदनशील राज्यातही सुरक्षा नाकारणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत.

दीड वर्षापूर्वी राजकारण अत्यंत संवेदनशील बनले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांच्या कार्यालयांवर व घरांवर हल्ले झाले होते. काही अनुचित घटना घडल्यानंतर केंद्राने प्रत्येक आमदारांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने, राज्यपाल यांनीही राज्य सरकारला आमदारांना सुरक्षा देण्याविषयी सूचना केल्या, परंतु आमदार बाबर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही सुरक्षा नाकारली.

आमदार बाबर यांच्या विटा येथील निवासस्थानी व कार्यालयाजवळ देण्यात आलेली सुरक्षा ठेवू नये, अशी भूमिका आमदार बाबर यांनी घेतली. विटा आणि परिसरात राजकीय आचारसंहिता पाळली जाते. राजकीय सुसंस्कृतपणा असल्याने कधीही अनुचित प्रकार घडत नाहीत. अशा परिस्थितीत सुरक्षा स्वीकारून अनावश्यक वातावरणनिर्मिती करण्यापेक्षा यंत्रणेवर ताण पडू नये.

तसेच या भागातील लोक समंजस आहेत आणि बाबर यांचा राजकीय वचक असल्याने सुरक्षेची गरज नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. या राजकीय घडामोडीत एक दिवसही त्यांनी सुरक्षा घेतली नाही. बहुमत परीक्षण झाल्यानंतर आमदारांना मुंबईहून गावी परतत असताना गृहविभागाने मुंबईपासून सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. बाबर यांनी ती सुरक्षाही नाकारली.

(लेखक : आमदार अनिल बाबर यांचे स्वीय सहाय्यक होते.)

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT