B S Yediyurappa  File Photo
ताज्या बातम्या

येडियुरप्पा काँग्रेसला देणार धक्का! अनेक आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट

राज्यात भाजप वाढवण्यासाठी येडियुरप्पांनी कंबर कसली आहे. आता त्यांनी काँग्रेसला धक्का देण्याची तयारी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. राज्यात भाजप (BJP) वाढवण्यासाठी येडियुरप्पांनी कंबर कसली आहे. त्यांनी राज्यात काँग्रेसला (Congress) धक्का देण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा येडियुरप्पांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपच्या अनेक आमदारांना काँग्रेसकडून गळ टाकला जात आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता येडियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसकडून निश्चितपणे असे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, काँग्रेसचे अनेक आमदारही आमच्या संपर्कात आहेत. ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. ते कोण आहेत हे लवकरच तुम्हाला कळेल. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार अथवा इतर कुणाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप 140 जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल.

पक्षाच्या कार्यकारिणीत बोलताना महसूलमंत्री आर.अशोक म्हणाले की, अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. याबाबत राज्य भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे परवानगी मागितली आहे. केंद्रीय नेतृत्वाचा हिरवा कंदील मिळताच अनेक पक्षांमधील नेते हे भाजपमध्ये दाखल होतील. पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांची यादीही आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे.

राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी स्वतंत्रपणे राज्याच्या यात्रेची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात येडियुरप्पा हे भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पांचा लिंगायत समाज आणि मठांवर मोठा प्रभाव आहे. ते आपला वारसदार म्हणून पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना समोर आणत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून येडियुरप्पा हे विजयेंद्र यांच्या राजकीय कारकिर्दीला बळ देतील आणि मुख्यमंत्री बोम्मई यांचे महत्व कमी करतील, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. येडियुरप्पा हे यात्रेच्या नावाखाली त्यांच्या समर्थकांना एकत्र करतील, अशीही भीती भाजप नेत्यांना सतावत आहे. कुटुंबाला कोणताही राजकीय फायदा असल्याशिवाय येडियुरप्पा हे यात्रा करणार नाहीत, असा भाजप नेत्यांचा कयास आहे.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT