मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन (Sakinaka Rape case) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्रयुद्ध रंगले आहे. यातच महाविकास आघाडीतील बिघाडी समोर येऊ लागली आहे. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी सुरवातीला मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित महिला सुरक्षाप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले होते. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांकडे करावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्यानेच असे पत्र पाठवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. यावर सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेते विश्वबंधू राय यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री हे एका प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांची राजकीय चिंता ही प्रादेशिकत आहे. आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी ते इतर राज्यांतील नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार आणि हिसेंचे वाढते गुन्हे अतिशय गंभीर आहेत. त्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अतिशय योग्य आहे. राज्यपालांनी हा मुद्दा गंभीरतेने घेतला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.
साकीनाका प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांना जबाबदार धरले आहे. बलात्कारी कोणत्याही धर्म, भाषा, जातीचे असोत त्यांना फाशीची शिक्षाच व्हावी. परंतु, मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांकडे बोट दाखवून आपल्या मतदारांना खूष केले आहे. अशा प्रकारचे राजकारण करणे योग्य नाही. केवळ एक अथवा दोन गुन्हेगारांवरुन पूर्ण समाजाला लक्ष्य करण्याचे राजकारण करू नये. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्याला एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. मग त्यांचा मंत्रीही परप्रांतीय होता का? मुख्यमंत्रीच राजकाऱण करू लागले तर जनतेने कुणाकडे जायचे? यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे. तुम्हीच आता महाराष्ट्राचा सन्मान कायम राखण्यासाठी या प्रकरणी न्याय करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.