नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रच्या आमसभेला (UNGA) संबोधित केलं. या भाषणांचं भाजपमधील अनेक नेत्यांनी कौतुक केलं आहे. असे असताना मोदी हे न्यूयॉर्क टाईम्सच्या (Ner York Times) पहिल्या पानावर झळकल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पृथ्वीसाठी शेवटची पण चांगली आशा, असा मथळाही त्यावर आहे. परंतु, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
मोदींच्या आमसभेतील भाषणानंतर काल (ता.26) न्यूयॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो व्हायरल झाला. त्यावर मोदींची बातमी होती. पृथ्वीसाठी शेवटची पण चांगली आशा, असा मथळा मोदींसाठी देण्यात आला होता. अनेक भाजप नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर हा फोटो शेअर करीत मोदींचे गुणगाण गात होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तपासली असता वेगळाच प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने मोदींची अशा प्रकारे कोणतीही बातमी प्रसिद्ध केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्हायरल झालेला मोदींचा फोटोही बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.
आमसभेतील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख टाळून दहशतवादाच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढले होते. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी आपल्यालाही त्याचा तेवढाच धोका असल्याचा विचार करायला हवा. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी किंवा दशहतवादी हल्ले करण्यासाठी होऊ नये, हे सुनिश्चित करायला हवं, असं पंतप्रधान म्हणाले होते.
मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौरा आटोपून परत आले आहेत. त्यांनी या दौऱ्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित केले. तसेच, 'क्वाड' परिषदेला उपस्थित लावून अनेक द्वीपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली. मोदींनी 20 मिनिटांच्या हिंदीत केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तान व चीनचा थेट उल्लेख करण्याचं टाळलं होतं. इम्रान खान यांनी मात्र, आपल्या भाषणात भारताचं नाव घेत टीका केली होती. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला होता.
आमसभेतील भाषणावरून मोदींवर काँग्रेसच्या नेत्यांनी निशाणा साधला होता. काँग्रेसचे नेते खासदार पी. चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणाबाबत ट्विट केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी मोजक्याच खुर्च्या भरलेल्या होत्या. त्यांच्या भाषणानंतर कुणी टाळ्याही वाजवल्या नाहीत. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो. संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्यत्वाचे भारताचे मिशन गडबडले आहे, असं चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मोदींच्या भाषणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांना लक्ष्य केलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना पंतप्रधान भारताला मदर ऑफ ऑल डेमोक्रसी म्हणाले आहेत. मला आशा आहे की, योगीजी आणि हिमंत बिस्वा शर्मा हे ऐकत असतील, असं ट्विट सिब्बल यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.