B S Yediyurappa  File Photo
ताज्या बातम्या

येडियुरप्पांना भाजप नेतृत्वाचा ब्रेक? यावर नवीन मुख्यमंत्री म्हणाले...

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात यात्रा काढणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) आता राज्यभरात यात्रा काढणार आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते भाजपला पुन्हा अडचणीत आणू शकतात. ही यात्रा हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे, अशी भीती भाजप नेतृत्वाला सतावत आहे. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी जाहीर भूमिका घेतली आहे.

येडियुरप्पांच्या यात्रेला भाजप नेतृत्वाने ब्रेक लावल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाल्याने अखेर मुख्यमंत्री बोम्मई यांनी जाहीर खुलासा केला आहे. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेला कोणाचाही विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. येडियुरप्पांनी राज्य यात्रा काढण्यात कोणतीही समस्या नाही. यामुळे या विषयावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी स्वतंत्रपणे राज्याच्या यात्रेची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना स्थान नसेल. या दौऱ्यात येडियुरप्पा हे भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. यामुळे पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. नेतृत्वाने केलेल्या विनंतीनंतर काही मोजक्या नेत्यांना यात्रेत सहभागी करुन घेण्यास येडियुरप्पांनी होकार दर्शवला आहे.

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर दोन महिन्यांत पक्षाने त्यांच्यावर कोणतीच संघटनात्मक जबाबदारी टाकलेली नाही. यामुळे येडियुरप्पा हे नाराज आहेत. येडियुरप्पांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते भाजपला पुन्हा अडचणीत आणू शकतात. त्यांनी 2013 मध्ये भाजप सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी काँग्रेसला विजय मिळाला होता. येडियुरप्पांनी त्यावेळी मोजक्या जागा मिळाल्या तरी भाजपचा पराभव करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पांचा लिंगायत समाज आणि मठांवर मोठा प्रभाव आहे. ते आपला वारसदार म्हणून पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना समोर आणत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून येडियुरप्पा हे विजयेंद्र यांच्या राजकीय कारकिर्दीला बळ देतील आणि मुख्यमंत्री बोम्मई यांचे महत्व कमी करतील, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. येडियुरप्पा हे यात्रेच्या नावाखाली त्यांच्या समर्थकांना एकत्र करतील, अशीही भीती भाजप नेत्यांना सतावत आहे. कुटुंबाला कोणताही राजकीय फायदा असल्याशिवाय येडियुरप्पा हे यात्रा करणार नाहीत, असा भाजप नेत्यांचा कयास आहे.

येडियुरप्पांच्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातून भाजपमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. येडियुरप्पांच्या यात्रेची तारीख स्वातंत्र्यदिनानंतर ठरली होती. नंतर पक्ष नेतृत्वाने विनंती केल्यानंतर गणेश विसर्जनानंतर यात्रा सुरू करण्याचे येडियुरप्पांनी मान्य केले होते. नंतर ही तारीख विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT