Nitin gadkari
Nitin gadkari File Photo
ताज्या बातम्या

नितीन गडकरींना 'हा' चित्रपट थिएटरमध्ये जाऊन तीनवेळा पाहिला!

सरकारनामा ब्युरो

पुणे : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बहुतेकवेळा आपल्या भाषणादरम्यान जुन्या आठवणींमध्ये रमतात. राजकारणासह कौटूंबिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात त्यांना आलेल्या अनुभवांचे किस्से सांगतात. काही स्मृती या आयुष्यभर आठवणीत राहतात, असं सांगत गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना सर्वाधिक आवडणाऱ्या एका चित्रपटाचा किस्सा सांगितला.

पुण्यातील सिम्बायोसिस विश्वविद्यालयाच्या विश्वभवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात वात्रटिकाकार रामदास फुटाणे लिखित 'जुनी, नवी पानं' हा गद्य संग्रह आणि 'कासा-20' या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांविषयीच्या आठवणी सांगताना गडकरी यांना 'सामना' चित्रपटाची आठवण झाली.

हा चित्रपट सर्वाधिक आवडत असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, तेंडूलकर, निळू फुले आणि श्रीराम लागूंचा अभियन, जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन यांमुळं या चित्रपटानं वेगळाच आनंद दिला. नागपूरातील रिजंट चित्रपटागृहात तीनवेळा हा चित्रपट पाहिला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...अशी एकाहून एक गीतं होती. असा चित्रपट आता नाही, असं गडकरी म्हणाले.

नवीन पिढीलाही कळलं पाहिजे, यासाठी या चित्रपटाचा रिमेक काढावा, असं आवाहन गडकरी यांनी रामदास फुटाणे यांना केलं. राजकारण आणि समाजाकारणात काय मार्मिक टिपणी केली पाहिजे, याची अचूक जाण असणारे म्हणजे रामदास फुटाणे, असं कौतुकही गडकरी यांनी यावेळी केलं.

सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी आदर

सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा जोपासला आहे. पक्षाचा अभिनिवेशन ठेवता राजकारण आणि समाजकारणात महत्वाची भूमिका बजावली. ते हवंहवंस वाटणारे राजकारणी आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी सोलापूरात गेलो होतो. माझ्या कार्यक्रमात शिंदे असतील, त्यांना आदरपुर्वक घेऊन या, असं आयोजकांना सांगितलं होतं. त्यांना व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि माझ्यामध्ये बसवत आदर व्यक्त केला. त्यांच्याविषयी आलेल्या अनुभवातून हा आदर व्यक्त केला होता. शिंदेचा यांचा आदर, सम्मान संपूर्ण महाराष्ट्रासह देशालाही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT