Sukanta Majumdar
Sukanta Majumdar File Photo
ताज्या बातम्या

भाजपचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं अन् आठवडाभरातच गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ता स्थापन करण्यासाठी निकराचे प्रयत्न करूनही अपयश आलेल्या भाजपला (BJP) वारंवार धक्के बसत आहेत. आमदार, खासदार, नेते पक्षाला रामराम ठोकत असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता भाजपने सुकांत मुजुमदार (Sukant Majumdar) यांना नवीन प्रदेशाध्यक्ष नेमले आहे. आता प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आठवडाभरातच मुजुमदार हे अडचणीत आले आहेत.

भाजपने दिलीप घोष यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार नुकताच काढून घेतला. त्यांच्या जागी खासदार डॉ. सुकांत मजुमदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर घोष यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. बंगालमध्ये घोष यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली पण पक्षाचा पराभव झाला होता. त्यातच निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. निवडणुकीआधी तृणमूलमधून आलेले नेते घरवापसी करत आहेत. खासदार बाबूल सुप्रियो यांनी मागील आठवड्यातच तृणमूलमध्ये प्रवेश केला. तसेच मुकुल रॉय यांच्यासह आतापर्यंत चार आमदारांनी भाजपची साथ सोडली आहे. तसेच आणखी काही आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याने बंगाल भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह घेऊन मजुमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालिघाट येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. कालिघाट हा अतिशय रहगदारीचा भाग मानला जातो. ध्रुजाती साहा या पराभूत भाजप उमेदवाराच्या मृतदेहासोबत मजुमदार आणि इतर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढली होती. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्ते आक्रमक होऊन संघर्ष झाला होता. या प्रकरणी मजुमदार यांच्यासह खासदार अर्जुनसिंह आणि जोतिर्मय महातो यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. उच्च सुरक्षेच्या भागात वाहतूक रोखल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात सध्या विधानसभेच्या तीन जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही पोटनिवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाच भाजपने मोठा निर्णय घेत घोष यांना बदलले. घोष यांना बदलण्यात आल्याने बंगाल भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोलले जात आहे. तृणमूलमधून आलेल्या नेत्यांना थांबवण्यात त्यांना अपयश येत आहे. भाजपची स्थिती बळकट होण्याऐवजी सध्या सातत्याने धक्के बसत आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त केल्यानंतर घोष म्हणाले होते की, पाच वर्षांपूर्वी मी पदभार स्वीकारला तेव्हा बंगालची स्थिती वेगळी होती. भाजपला फारसे स्थान नव्हते. पण आता भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. तृणमूलप्रमाणे आमची ताकद आहे. मला खूप अनुभव मिळाल्याने पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT