Eknath Shinde Latest Marathi News sarkarnama
देश

एकनाथ शिंदेंचे 'मिशन दिल्ली' यशस्वी : शिवसेना फोडूनच विमानात बसले....

शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीए उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाने शिवसेना (Shivsena) खासदारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. व तोच खासदारांच्या लोकसभेतील बंडाचा ठळक बिंदू ठरला असा गौप्यस्फोट आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वतीने करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचारांनुसार आम्ही विधानसभेत बहुमताने सरकार बनविले आहे. लोकसभेतही आमच्याकडेच बहुमत असून आम्ही भाजप (BJP) आघाडीचेच घटक आहोत. आमच्या 12 खासदारांच्या गटाला लोकसभाध्यक्षांनी शिवसेना म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र दिले आहे असे प्रतिपादन शिंदे यांनी आज केले.

एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले होते. शिंदे दिल्लीमध्ये गेल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. खासदारांचा वेगळा गट निर्माण करुनच शिंदे परत महाराष्ट्राकडे निघाले. दरम्यान, भाजप शिवसेना युती पुन्हा व्हावी यासाठी खुद्द उध्दव ठाकरे यांनीच वारंवार अनुकूलता दाखविली होती, त्यांनी याबाबत वारंवार सकारात्मक व अनुकूल भूमिका घेतली होती, असा दावा शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहूल शेवाळे यांनी केला. उध्दव ठाकरे यापूर्वी जेव्हा पंतप्रधानांबरोबर दिल्लीत चर्चा केली तेव्हाही त्यांनी हीच भावना बोलून दाखविली होती, असा दावा शेवाळे यांनी केला. त्यानंतर ठाकरे यांनी, मी भाजपबरोबर युतीसाठी तयार आहे. युतीसाठी आता तुम्हीच प्रयत्न करा, असे आम्हा 4-5 खासदाराना सांगितले होते असेही, शेवाळे म्हणाले.

आम्ही कोणतेही नियमबाह्य काम केले नाही. लोकशाहीत बहुमताला महत्व असते व ते आमच्याकडे विधानसभेत व लोकसभेतही आहे, असेही ते म्हणाले. बाळासाहेबांची भूमिकाच आम्ही मांडत असल्याने आम्हाला जनतेतून पाठिंबा मिळत आहे. लोकसभेत शिवसेनेचा गटनेता बदलल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे असे सांगताना शिंदे यांनी केंद्रीय मंत्रीपदावर दावा सांगण्याबाबत आता काही बोलणार नाही असी भूमिका घेतली. शिवसेनेच्या खासदारांनी केवळ लोकसभेतील गटनेते बहुमताने बदलले आहेत. पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी याच असून सेनेच्या साऱ्या खासदारांवर त्यांचा निर्णय बंधनकारक राहील, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी उर्वरीत 6 खासदारांना दिला.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप-शिवसेना युतीत खोडा घातला असा आरोप शेवाळे यांनी केला. आम्ही लोकसभेत शिवसेनेचा कोणताही वेगळा गट स्थापन केलेला नाही. लोकसभेतील पक्षाच्या प्रतोद भावना गवळी यांच आहेत. त्यांनी बहुमताने लोकशेबतील शिवसेनेचा गटनेता बदलला आहे. मोदी सरकारमधून बाहेर पडून अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हाही एनडीएतून बाहेर पडल्याचे शिवसेनेने लोकसभा सचिवालयाला कळविले नव्हते. त्यामुळे शिवसेना अधिकृतरीत्या शिवसेना आजही एनडीएतच असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.

आमच्या सरकारचा कोणताही छुपा अजेंडा नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी भाजपबरोबर युती करावी, ही सर्वसामान्यांच्या मनातील भूमिकाच आम्ही घेतली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या, सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वेगवान निर्णय घेतल्याचे नमूद केले. या 12 खासदारांबरोबर संवाद साधणे, लोकसभेतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत करणे व ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या (ता.20) होणाऱ्या सुनावणीबाबत कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठीही आपण दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले.

आज दिल्लीत आलेले खासदार दबावातून आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी साफ फेटाळला. अशी टिप्पणी करणार्यांचा 'मॅटिनी शो' आता बंद झाला असला तरी त्यांच्या बोलण्यावर बोलण्याची गरज नाही. तुम्हालाही रोज काही ना काही बातम्या हव्या असतात, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले.

शिवसेनेच्या 12 खासदारांसह दिल्लीत पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व आनंद दिघे यांच्या विचारांची भूमिका घेऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार आम्ही स्थापन केले. 50 आमदारांनी घेतलेल्या त्या भूमिकेचे समर्थन राज्यभरातील शिवसेना कार्यकर्ते व जनतेनेही केल्याचे शिंदे म्हणाले. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते ते राज्यात घडले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी तसेच जनहिताचे अनेक निर्णय तातडीने घेतले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात अनेक निर्णयांचा त्यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्राच्या नव्या सरकारला असून राज्याच्या विकासासाठी काहीही कमी पडू दिले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेनेवरील वर्चस्वाची लढाई दिल्लीत येऊन पोहचली आहे. आपल्याकडे दोन तृतीयांश खासदारांचे बळ असल्याने संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा सांगितला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे आजचे प्रतिपादन महत्वपूर्ण होते. 12-15 लाख मतदारांतून निवडून आलेल्या खासदारांनीही या लोकांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT