फडणविसांनी एकनाथ शिंदेंना फुगवले... आणि त्यांनी उद्धवजींवर सूड घेतला...

शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांबरोबरच आता खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. त्यावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेली ही टिप्पणी.
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांबरोबरच आता खासदारांनीही त्यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सोमवारी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज विविध माध्यमांना मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीमध्ये कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना फोडली असा आरोप केला. त्यावरुन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी एकनाथ शिंदे गटाचा आपल्या लेखाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला आहे.

आपल्या लेखामध्ये हेमंत देसाई म्हणाले, 'शरद पवार शिवसेना संपवायला निघाले आहेत', असा एकनाथ शिंदे गटाचा, म्हणजेच भाजपच्या 'ए' टीमचा आरोप आहे. जे हा आरोप करत आहेत, त्यापैकी अनेक शिंदेभक्तां (नवभक्त) नी महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली, तेव्हा भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेऊन, 'शरद पवार हे कसे कसलेले मल्ल आहेत', यावर टेलिव्हिजनसमोर येऊन भाष्य केले होते! दगाबाजी करण्यापूर्वी यापैकी कोणीही पत्रकार परिषद घेऊन पवारांवर हल्लाबोल केला नव्हता किंवा शिवसेनेच्या बैठकीत सर्वांनी मिळून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाकडे, म्हणजेच भाजपकडे चला, असे सांगितले नव्हते.

त्यावेळी 'शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो, उद्धवजी जे सांगतील त्याचे आम्ही पालन करतो', असे तत्त्वज्ञान ऐकवले जात होते. परंतु एकनाथवाद्यांनी तेव्हा बैठक घेऊन आपण, म्हणजेच अखंड शिवसेनेने भाजपच्याच बरोबर जायचे, असा ठराव का संमत केला नाही? जे शक्तिप्रदर्शन पूर्वी एकदा एकनाथजींनी केले होते, तसे त्यांनी पुन्हा का केले नाही? अयोध्येला संजय राऊतांबरोबर एकनाथजी गेले, तेव्हा 'शिवसेनेचा हा ढोंगीपणा आहे. पहिल्यांदा महाआघाडीतून बाहेर पडू आणि मगच अयोध्याला जाऊ' असे एकनाथजींनी का सुनावले नाही? समजा आता या घडीला उद्धवजींनी, 'मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि भाजपच्या मदतीने पुन्हा मुख्यमंत्री होतो' असे म्हटले, तर ते एकनाथजींना आणि त्यागमूर्ती देवेंद्रजींना चालेल का? खरे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी देखील उद्धवजींनी उशिरा का होईना, दाखवली होती.

Cm Eknath Shinde
Eknath Shinde यांच्या शेजारी बसताच राहुल शेवाळेंनी बाॅम्बगोळाच टाकला...

मात्र, एकनाथजींना अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकरप्रमाणे, फलंदाज उद्धवजींची 'विकेट' घ्यायची होती. स्वतःला मुख्यमंत्री होऊन सेनेवर वर्चस्व गाजवण्याची इच्छा होती. बरेच दिवस त्यांची हिंमत होत नव्हती, पण 'कलाकार' असलेल्या देवेंद्रजींनी त्यांना हवा भरून फुगवले. कारण देवेंद्रजींना उद्धवजींवरचा सूड उगवायचा होता.. आणि मग अखेर एकनाथजी यास तयार झाले... केंद्र सरकारने पुरवलेली सुरक्षा, सुरत, गुआहाटीमध्ये व्यवस्था, खोकी खोकी भरून मिळणारे प्रेम आणि केंद्राकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन यामुळेच शेवटी एकनाथजींनी हिम्मत केली असावी!

आता त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. चांगले आहे! मात्र, पवार जर शिवसेना संपवायला निघाले असे कोणी म्हटले, तर त्याला 'केवळ एक माणूस 56 वर्षांचा पक्ष संपू शकतो का?' असा प्रश्न विचारणे भाग आहे. मोदी-शहा-देवेंद्र हे त्रिकूट शिवसेनेच्या उद्धारासाठी हे सर्व करत आहे का, हेही एकनाथजींनी जरा समजून घ्यावे. मात्र, ज्यांना समजूनच घ्यायचे नाही आणि आपल्या प्रचंड महत्त्वाकांक्षेस आवर मात्र घालायचा नाही, त्यांचे आपण काहीच करू शकत नाही... त्यांनी वर्षोनुवर्षे मुख्यमंत्री जरूर राहावे, परंतु या सगळ्यास हिंदुत्वाचे तात्त्विक अधिष्ठान देण्याचा उद्योग करू नये. तो शुद्ध बकवास आहे!

कोर्टाचा निर्णय उद्या वा नंतर एकनाथजींच्या बाजूचा आला, तर मग एकनाथजी असो किंवा केसरकर असोत, त्यांची उद्धवसेनेविरुद्धची भाषा अधिकाधिक उग्र होत जाईल. आज 'उद्धवजींबद्दल अपशब्द खपवून घेतला जाणार नाही', 'शिवसेना ही आमची माता आहे' आणि 'बाळासाहेब हे आमचे दैवत आहे', असे हे सर्व म्हणत आहेत. ही सौम्य, फसवी आणि लबाडीची भाषा न्यायालयाच्या निकालानंतर थांबेल व उघड-उघड ठाकरेविरोधी हल्ला सुरू होईल.

मात्र 2024 च्या निवडणुका येण्यापूर्वी आणि नंतर हे चित्र बदललेले असेल. कारण मग भाजपचा 'प्रेमळ' मुखवटा गळून पडेल आणि एकनाथ शिंदे गटाला भाजप आपली खरी जागा दाखवून देईल. त्यावेळीच शिंदे गटाचे डोळे उघडतील! दीर्घकाळात हिंदुत्वाच्या मतपेढीच्या बाजारपेठेत भाजपला कोणीही भागीदार नको आहे, हे एकनाथजींनी लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेत बैठक घेऊन, आमदारांचे बहुमत माझ्या मागेच आहे, असे दाखवून देऊन, जर एकनाथजींनी मुख्यमंत्रीपद प्राप्त केले असते, तर ते अधिक शोभा देणारे ठरले असते. तो खरा लोकशाही मार्ग ठरला असता.

मात्र, फितुरीचा शॉर्टकट पत्करून त्यांना पद मिळाले असले, तरी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा मिळणार नाही. त्यासाठी त्यांना शिवसेनेचे नाव न वापरता, आपली स्वतंत्र ताकद दाखवून द्यावी लागेल. पवारांना शिवसेना संपवायची असेल, तर मग देवेंद्रजींना तरी शिवसेनेची ताकद वाढावी, असे वाटत आहे का? हा प्रश्न एकनाथजींनी स्वतःलाच विचारावा. जे अजितदादा फंड देत नव्हते, म्हणून बोंबा मारल्या जात आहेत, त्यांच्याबरोबरच मागे देवेंद्रजींनीच सरकार स्थापले होते!

Cm Eknath Shinde
'पवारसाहेब, मी घरी बसतो; पण विधानसभेला वळसे पाटलांनाही घरी बसवा!'

गेल्या बजेटमध्ये सर्वाधिक वाटा राष्ट्रवादीला मिळाला, सेनेची उपेक्षा झाली, हा आरोप देवेंद्रजींनी केला, तेव्हा ती सर्व माहिती त्यांना एकनाथजींनी दिली असावी किंवा निदान देवेंद्रजींनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करावा, असे एकनाथजींनी त्यांना सांगितले असू शकते. तेव्हापासूनच बंडाची तयारी सुरू होती, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. काँग्रेसवाले सरळ-सरळ खुर्चीसाठी हाणामाऱ्या करतात, ते त्यास उगाचच तात्त्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करत नाहीत! एकनाथजींना खुर्चीच हवी होती. मात्र, त्यांनी मात्र या सगळ्यास हिंदुत्वाचे आवरण दिले. हिंदुत्वासाठी कारसेवकांनी बलिदान दिले, हिंदुत्वासाठी काही जणांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास पत्करला. हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पटकवण्याचा मान फक्त नि फक्त एकनाथजींनीच मिळवून अखिल भरतखंडात विक्रम केला आहे.. असो हे हिंदुत्वयुक्त 'एकनाथी भारुड' चालू राहू द्या! असा टोला देसाई यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com