<div class="paragraphs"><p>jarkiholi brothers</p></div>

jarkiholi brothers

 

Sarkarnama

देश

देशमुख, पवार, ठाकरे हे पण मागे पडले : येथे तर एकाच घरात 'चार' आमदार झाले

सरकारनामा ब्युरो

बेळगाव : महाराष्ट्रात राजकीय घराणी म्हणून ठाकरे (Thackeray), पवार (Pawar) , देशमुख (Deshmukh) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका घरात किमान २ तरी आमदार आहेत. मात्र बेळगावमधील जारकीहोळी बंधूंनी (Jarkhiholi Brothers) यांनी ठाकरे, पवार, देशमुखांनाही मागे पाडले आहे. कारण जारकीहोळी यांच्या एकाच घरात तब्बल ४ आमदार सद्यस्थितीमध्ये कर्नाटक विधीमंडळात आहेत. सोबतच यामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघेजण सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आजच्या जाहीर झालेल्या विधानपरिषदेच्या निकालानंतर लखन जारकीहोळी हे चौथे आमदार झाले आहेत.

विषेश गोष्ट म्हणजे चारही जारकीहोळी बंधू हे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. सध्या २ भाजपचे, १ काँग्रेसचे आणि १ अपक्ष असे पक्षीय गणित त्यांच्या घरात आहे. हे गणित अगदी पुर्वीपासून त्यांच्या घरात चालत आलेले आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्याच्या पॅटर्नमुळेही जारकीहोळी बंधू नेहमीच चर्चेत असतात. पण अशा स्थितीतही जारकीहोळी कुटुंबातील पाच जणांपैकी चौघे आमदार झाले आहेत.

मूळचे गोकाकचे असलेल्या जारकीहोळी बंधूंचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. १९९९ साली रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ पर्यंत ते कॉंग्रेस पक्षातच होते व सलग पाचवेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. पण २०१९ साली त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला व भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपकडून पोटनिवडणूक लढविली व ते विजयी झाले. त्यावेळी दोन्ही पक्षातून ते मंत्री झाले होते. सध्या ते भाजपचे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

दुसरे भालचंद्र जारकीहोळी (Bhalchandra Jarkiholi) हे सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विधानसभेचे आमदार होते. मात्र २००८ साली त्यांनी येडीयुरप्पा यांच्या 'ऑपरेशन लोटस'वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपमध्येच आहेत. २००८ साली भाजप सत्तेत असताना ते मंत्री होते. भालचंद्र जारकीहोशळी हे सध्या भाजपचे आरभावी मतदारसंघाचे विधानसभेतील आमदार आहेत.

तिसरे सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) ही आधी धर्मनिरपेक्ष जनता दलात विधानपरिषदेचे सदस्य होते. पण २००६ साली सतीश यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर २००८ साली यमकनमर्डी मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली व जिंकलीही. त्यानंतर ते आजही काँग्रेसचेच आमदार आहेत. राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना सतीश यांना मंत्रीपद मिळाले होते, ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT