8th Pay Commission Sarkarnama
देश

8th Pay Commission: ₹22,450 पेन्शन थेट ₹57,697 होणार? चर्चेतील आकड्यामागचं खरं गणित समजून घ्या

8th Pay Commission Pension: केंद्रीय पेन्शनधारकांच्या खात्यात आता हजारो रुपयांची वाढ होणार का? २२,४५० रुपयांची पेन्शन थेट ५७,६९७ रुपयांवर जाण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या आकड्यामागे नेमकं काय गणित आहे?

Mangesh Mahale

Central Employees News: आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये वेतन व पेन्शनवाढीबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः सध्याच्या पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते, याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे आकडे फिरत आहेत. त्यापैकी २२,४५० रुपयांची पेन्शन ५७,६९७ रुपयांपर्यंत जाऊ शकते, हा दावा सध्या चर्चेत आहे. मात्र, हा आकडा अधिकृत नसून एका विशिष्ट फिटमेंट फॅक्टरच्या आधारे काढलेले गणित आहे.

नेमका ५७,६९७ रुपयांचा आकडा कुठून आला?

यामागे २.५७ फिटमेंट फॅक्टरचा आधार घेतला जात आहे. म्हणजेच २२,४५० रुपयांच्या सध्याच्या पेन्शनला २.५७ ने गुणल्यास ५७,६९७ रुपये ही रक्कम मिळते. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यामुळे आठव्या वेतन आयोगासाठीही हाच आकडा गृहीत धरून पेन्शनवाढीचे अंदाज मांडले जात आहेत.

पण याठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे आठव्या वेतन आयोगाने अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित केलेला नाही. २.५७ व्यतिरिक्त २.२८ किंवा २.१५ अशा पर्यायांचीही चर्चा आहे. काही कर्मचारी संघटना यापेक्षाही मोठी वाढ मिळावी, यासाठी ३.८ ते ४ पट फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला ५७,६९७ रुपयांची पेन्शन निश्चित मानणे घाईचे ठरेल.

पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

काही कर्मचारी आणि पेन्शन संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेतील पेन्शनचा दर शेवटच्या वेतनाच्या ५० टक्क्यांवरून ६७ टक्के करण्याची मागणी केली आहे. याशिवाय फॅमिली पेन्शन ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी आणि नागरी पेन्शनधारकांनाही ‘वन रँक, वन पेन्शन’सारखा लाभ मिळावा, अशा मागण्या करण्यात येत आहेत.

अंतिम रक्कम कधी स्पष्ट होणार?

आयोगाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार २०२७ च्या मध्यापर्यंत अहवाल सादर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आयोगाच्या शिफारसी आणि केंद्र सरकारची मंजुरी यावर पेन्शनवाढीचा अंतिम निर्णय अवलंबून असेल.

त्यामुळे २२,४५० रुपयांची पेन्शन ५७,६९७ रुपये होणार, हा सध्या केवळ २.५७ फिटमेंट फॅक्टरवर आधारित अंदाज आहे. अंतिम पेन्शन किती असेल, हे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि त्यावरील केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

आयोगाची स्थापना कधी झाली?

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे काम सुरू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये कोणते बदल करावेत, यासंदर्भात शिफारसी करण्याचे काम आयोग करणार आहे.

आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. चेन्नईनंतर ९ सप्टेंबरला पुडुचेरी, १६ सप्टेंबरला चंदीगड आणि ७ ऑक्टोबरपासून बंगळुरूमध्ये बैठका होणार आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या या बैठकीत मांडल्या जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT