Maval News: मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत कर थकबाकी प्रकरणावरून मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचासह उपसरपंच आणि चार सदस्य अशा सहा जणांना अपात्र ठरवण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अपात्र ठरलेल्यांमध्ये सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी, सदस्य विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे, सारिका पदमुले आणि कविता चौरे यांचा समावेश आहे. भाजे ग्रामपंचायतीत सरपंचासह एकूण दहा सदस्यांची संख्या आहे. त्यापैकी सहा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर चार सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांवरच अपात्रतेची कारवाई झाल्याने ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणाला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत न भरल्याचा मुद्दा या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. याच प्रकरणात प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांनी अर्ज दाखल केला होता.
या अर्जानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. संबंधित कागदपत्रांची तपासणी तसेच सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी अपात्रतेचा आदेश दिला. त्यामुळे भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांच्या पदांवर गंडांतर आले आहे.
या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विकास वाल्हेकर यांनी मात्र विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय आकसातून ग्रामसेवकांना हाताशी धरून आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कर थकबाकीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, ग्रामसेवक गजानन जाधव यांनी सरपंचासह संबंधित सदस्यांनी ग्रामपंचायत कराची थकबाकी भरली नसल्याने कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजे ग्रामपंचायतीतील या कारवाईने आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सहा सदस्य अपात्र ठरल्यानंतर ग्रामपंचायतीचे पुढील कामकाज कोणत्या पद्धतीने चालणार? सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसला या धक्क्यातून सावरणे शक्य होणार का? आणि भाजपला या बदललेल्या समीकरणाचा राजकीय फायदा मिळणार का, याकडे मावळचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि भाजपचे चार सदस्य असताना राष्ट्रवादीच्या सहाही सदस्यांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजे ग्रामपंचायतीत नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता आहे.
कर थकबाकीच्या कारवाईने सुरू झालेला हा वाद आता कुठे थांबतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजे ग्रामपंचायत कार्यालयातील राजकारण येत्या काळात आणखी तापण्याची चिन्हे असून, या निर्णयानंतर मावळच्या राजकीय पटलावर आणखी कोणते धक्के बसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.