Explosion in CM Nitish Kumars Program
Explosion in CM Nitish Kumars Program Sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच धमाका; सुरक्षेव्यवस्थेत पुन्हा त्रुटी राहिल्याने खळबळ

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या कार्यक्रमातच मंगळवारी दुपारी धमाका झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांपासून काही अंतरावरच बॉम्बसदृश मोठा आवाज झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता नितीशकुमार यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरूणाने त्यांच्या जवळ जात मारण्याचा प्रयत्न केला होता.

बिहारमधील (Bihar) नालंदा येथे आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली आहे. सिलाव येथे गांधी हायस्कूलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नितीशकुमार या कार्यक्रमाला हजर असताना त्यांच्यापासून काही अंतरावर अचानक स्फोटासारखा आवाज आला. त्यामुळे कार्यक्रमात जमलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. सुरूवातीला नेमकं काय झालं, हे कळत नव्हतं. त्यामुळे पोलिसांसह (Police) मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकही हादरले होते.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापासून काही अंतरावरच हा धमाका झाला असला तरी ते सुरक्षित आहेत. त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. तसेच कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनाही इजा झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, हा धमाका फटाक्यांचा असल्याचा सांगितले जात आहे. पण अद्याप पोलिसांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीही हल्ला

बिहारमधील बख्तियारपूरमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वीच ही घटना घडली आहे. बख्तियारपूर मार्केट परिसरातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ताफा जात होता. यावेळी त्यांना भेटण्यासाठी येथील नागरिकांनी रस्त्यावर दोन्ही बाजूला एकच गर्दी केली होती.

नागरिकांना भेटण्यासाठी नितीश कुमार यांनी आपली गाडी थांबवली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता. त्यांनतर येथील रॅलीला मागर्दर्शन करण्यासाठी नितीश कुमार निघाले. ते व्यासपीठावर आले अन् अचानक एका अज्ञात तरुणाने त्यांच्या पाठीवर बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार यांच्या बाजूला असलेल्या सुरक्षारक्षकांची त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT