Chitra Rankrishna Sarkarnama
देश

'योगी'च्या नादी लागल्या अन् शेअर बाजारात घेतले अनेक धक्कादायक निर्णय; 'सेबी'चा खुलासा

'एनएसई' व्यवस्थापकीय संचालक असताना चित्रा रामकृष्ण यांनी अनेक निर्णय हिमालयातील एका योगीच्या सल्ल्याने घेतल्याचा खलबळजनक खुलासा सेबीनं केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराशी संलग्न असणाऱ्या चित्रा रामकृष्ण (Chitra Rankrishna) वादात अडकल्या आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्या बाजराशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय एका योगीच्या सल्ल्याने घेत होत्या, असा खळबळजनक खुलासा भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (SEBI) केला आहे.

चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या पदाचा राजीनामा 2016 मध्येच दिला आहे. दोन वर्ष निवृत्तीआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने त्याची बरीच चर्चाही झाली होती. त्याच्यासह इतरांविरोधात सेबीने काढलेल्या आदेश हिमालयातील एका योगीबाबत खुलासा करण्यात आला आहे. सेबीने रामकृष्णन व इतरांना दंडही ठोठावला आहे. सेबीकडून एनएसईने घेतलेल्या विविध निर्णय, अनियमिततेच्या चौकशीमध्ये या बाबी समोर आल्यानंतर ही कारवाई केली आहे. (Share Market Update)

रामकृष्ण यांनी महत्वाची आणि गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोपही सेबीने लावला आहे. सेबीने केलेल्या खुलाशानुसार, रामकृष्ण या हिमालयातील एका योगी बाबाच्या सल्ल्याने बाजाराशी संबंधित महत्वाचे निर्णय घेत होत्या. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली. त्यांच्या वेतनातही मोठी वाढ झाली केली. सुब्रमण्यम यांची नियुक्ती 2013 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वेतन 1.68 कोटी होती. दोन वर्षांत हे वेतन तब्बल पाच कोटींवर पोहचले. हे सर्व योगीच्या सल्ल्याने सुरू होते.

रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या कालावधीत एनएसईच्या प्रमुख होत्या. या काळात योगी बाबांचा उल्लेख त्या शिरोमणी असा करत होत्या. मागील वीस वर्षांपासून त्या अनेक महत्वाच्या बाबतीत त्यांचाच सल्ला घ्यायच्या. योगी बाबाकडे अध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा त्या करत होत्या. या बाबी समोर आल्यानंतर सेबीने रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांना तीन वर्षांपासून बाजारातील सर्व कामकाजात सहभागी होण्यास बंदी घातली आहे.

रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. चित्रा रामकृष्ण यांच्यासह रवि नारायण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्यावर दोन कोटी आणि मुख्य नियामक अधिक व्ही. आर. नरसिम्हन यांना सहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सेबीच्या या खुलाशामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT