पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या (Goa Election 2022) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सोमवारी (ता. 14) मतदान होणार आहे. काँग्रेस (Congress) व भाजपकडून आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. चाळीस विधानसभा सदस्य असलेल्या गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी 21 ही मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. भाजपने (BJP) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. पण त्यांना हा आकडा गाठण्यासाठी पणजीसह अन्य काही मतदारसंघांमध्ये त्यांचा कस लागणार आहे.
फडणवीस व गोव्याचे (Goa) प्रभारी असून त्यांनी काही मुलाखतींमध्ये भाजपला गोव्यात 21 जागा मिळतील असा दावा केला आहे. मागील निवडणुकीत भाजपला केवळ 13 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने 17 जागा मिळवत वर्चस्व सिध्द केलं होतं. पण प्रत्यक्षात भाजपने काँग्रेसच्या तोंडचा घास हिरावून घेत सत्ता स्थापन केली. आता पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळण्याची आशा आहे. मागील काही दिवसांपासून फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. अनेक मतदारसंघात त्यांच्या निवडणूक कौशल्याचा कस लागणार आहे. त्यातील काही महत्वाच्या मतदारसंघातील राजकीय स्थिती फडणवीसांची डोकेदुखी वाढवणारी आहे. (Goa Election Update)
पणजी : बाबूश मोन्सेरात विरूध्द उत्पल पर्रीकर
गोव्यातील सर्वात हायहोल्टेज लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. पणजी (Panji) मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्यामागे सुप्त लाट असल्याची चर्चा आहे. पण हा मतदारसंघत बाबूश यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे पर्रीकर यांच्यासाठीही ही लढत सोपी नाही. असे असले तरी भाजपसाठी हा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा बनला आहे. पर्रीकर यांना तिकीट नाकारत मोन्सेरात यांनी उमेदवारी मिळाल्याने भाजपला विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे.
मांद्रे : दयानंद सोपटे विरूध्द लक्ष्मीकांत पारसेकर
मांद्रे मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान आमदार दयानंद सोपटे रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील गणितं बदलली आहे. तर एमडीपीचे जीत अरोलकर हेही मैदानात आहेत.पारसेकर यांनी तीनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोपटे यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये असतानाचा त्यांचा पराभव केला. त्यानंतर वर्षभराने सोपटे हे भाजपमध्ये दाखल झाले.
साखळी : प्रमोद सावंत विरूध्द धर्मेश सगलानी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्याविरूध्द काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी आव्हान उभे केले आहे. या भागात खाणींचे प्रमाण जास्त आहे. खाणी सुरू करण्यात आलेल्या अपयशामुळे नाराजी आहे. तसेच बेरोजगारीचाही प्रश्नावर काँग्रेसने जोर लावला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना, मगो व आपचे उमेदवारही मैदानात आहेत. मागील निवडणुकीत सावंत यांचा केवळ 2 हजार 131 मतांनी विजय झाला होता.
पर्ये : दिव्या राणे विरूध्द रणजित राणे
पर्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांच्या सून व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर नशीब आजमावत आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून प्रतापसिंह राणे हेच सुनेच्या विरूध्द लढणार असे चित्र होते. पण त्यांनी आयत्यावेळी माघार घेतल्याने रणजित राणे यांनी तिकीट मिळालं. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेससह भाजपची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. कारण अनेकांनी भाजपच्या या घराणेशाहीवर बोट ठेवलं आहे.
सांगे : सुभाष फळदेसाई विरूध्द सावित्री कवळेकर
गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांच्या पत्नी सावित्री कवळेकर (Savitri Kavlekar) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून सांगे मतदारसंघातून भाजपला आव्हान दिलं आहे. या मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार प्रसाद गावकर यांना तिकीट दिलं आहे. भाजपमधील नाराजीचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
सावर्डे : गणेश गावकर विरूध्द दीपक पाऊसकर
सावर्डेमध्ये भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपने विद्यमान आमदार दीपक पाऊसकर यांचे तिकीट कापत माजी आमदार गणेश गावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाऊसकर हे अपक्ष म्हणून रिगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार आहे. 2017 मध्ये पाऊसकर मगोचे उमेदवार होते. त्यांनी गावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये पाऊसकर भाजपमध्ये दाखल झाले. या मतदारसंघात मगोचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.