Bhagwant Mann and Arvind Kejriwal
Bhagwant Mann and Arvind Kejriwal Sarkarnama
देश

'आप'चा दे धक्का! एकाच फटक्यात 5 खासदार निवडून आणले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबचे मैदान मारल्यानंतर आता आणखी एक मोठा विजय मिळवला आहे. राज्यसभेवर (Rajya Sabha) आपचे पाच खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. एकाच फटक्यात राज्यसभेचे पाच खासदार वाढवण्याची कामगिरी आपने केली आहे. यामुळे आपचे आता राज्यसभेतील वजन वाढले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजनसिंग यांचा या पाच खासदारांमध्ये समावेश आहे.

क्रिकेटपटू हरभजनसिंग (Harbhajan Singh), राघव चढ्डा (Raghav Chadda), संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल आणि संजीव अरोरा यांना 'आप'ने पंजाबमधून (Punjab) राज्यसभेची उमेदवारी घोषित केली होती. हरभजनसिंगच्या राजकीय इनिंगची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानुसार पाच नावांमध्ये त्याचाही समावेश करण्यात आला होता. हे पाचही जण राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे आपचे राज्यसभेतील संख्याबळ आणि दबदबाही वाढला आहे.

आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती मानले जातात. पाठक हे पंजाबमध्ये तीन वर्षांपासून काम करत होते. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान असल्याची चर्चा आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे कृष्णा प्रण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल टॅस्टचे संस्थापक संजीव अरोरा हेसुद्धा राज्यसभेवर गेले आहेत.

राघव चढ्ढा हे पंजाबमधील आपचे सहप्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या मतदारसंघातच सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी रान उठवलं होतं. त्याचा फटका चन्नी यांना बसल्याचे निवडणुकीत दिसून आले. पंजाबमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षिस चढ्ढा यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. ते 33 वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये 117 पैकी तब्बल 92 जागा जिंकत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव केला. त्यामुळे राज्यसभेत संसदेत 'आप'ला पाच खासदारांचा बोनस मिळाला आहे.

दरम्यान, देशात सध्या 13 जागांसाठी राज्यसभेची (Rajya Sabha) निवडणूक जाहीर झाली होती. राज्यसभेत 2 ते 9 एप्रिल या काळात पंजाबमधून राज्यसभेवर असलेले सर्वाधिक 5, हिमाचल प्रदेशातून 4, आसाममधून 2 आणि नागालँड व त्रिपुरामधून प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होत आहे. यासाठी 31 मार्चला मतदान होणार आहे. पंजाबमधील याच 5 जागांवर 'आप'ने खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे राज्यसभेत 'आप'च्या खासदारांची संख्या 3 वरून थेट आठवर गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT