Modi Government news : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलनाची देशभरातली तीव्रता वाढत असतानाच केंद्र सरकारने आता आंदोलकांशी बोलणी सुरू केली आहेत. याबाबतची बैठकही दिल्लीत सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही सुरू असून त्यामध्ये आंदोलनासह पेपरफुटी कायद्यामध्ये मोठा बदल करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. दिल्लीत या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता नवा वाद उफाळून आला आहे.
केंद्र सरकारने गुरूवारी रात्री उच्च शिक्षण सचिवांसह विविध विभागांमधील अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या आहे. उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पंचायत राज विभागात पाठविण्यात आले आहे. तर पशुसंवर्धन खात्याचे सचिव नरेश पाल गंगवार हे नवे उच्च शिक्षण सचिव असतील. दीपके यांनी गंगवार यांच्या नियुक्तीवर बोट ठेवत सरकारला घेरले आहे.
गंगवार यांच्या नियुक्तीवरून आता नवा वाद उफाळला असून दीपके यांनी त्यावर आक्षेप घेत पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय लढा थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दीपके यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये या बदल्यांवरून सरकारवर टीका केली आहे. जबाबदारी निश्चित करण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दीपके यांनी म्हटले आहे की, शिक्षण सचिव पदावर पशुसंवर्धन विभागातील एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे पेपरफुटी आणि NEET परीक्षेवर संकट निर्माण झाले होते. त्यानंतरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे म्हणजे देशभरातील तरुणांचा थेट अपमान आहे.
आम्ही तडजोडीचा मार्ग स्वीकारावा, अशी सरकारला अपेक्षा आहे का, असा सवाल करत दीपके यांनी ही जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट केले. प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करत आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी आता त्यावरूनच वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार, गंगवार यांची पुन्हा बदली होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.