Sonu Sood, Malvika Sood Sarkarnama
देश

बहीण निवडणूक लढणार पण सोनू सूद प्रचारच करणार नाही!

मालविका सूद यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना मोगा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबमधील (Punjab) आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेस पक्षाकडून अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) बहिणीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत सोनू सूदही बहिणीच्या प्रचारासह काँग्रेसलाही (Congress) मदत करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण याबाबत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकारणाशी काही देणंघेणं नसल्याचं सांगत सूद याने राजकारणापासून फारकत घेतली आहे.

सोनू सूदची बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मोगा विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. मालविका यांच्या आपसोबतही अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या. पण त्यातून काहीच हाती लागले नाही.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानुसार निवडणूक जाहीर होताच मालविका यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण सोनू सूद यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती त्याने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे.

बहिणीच्या राजकारणातील प्रवेशावर बोलताना तो म्हणाला, 'राजकारणात जाण्याचा बहिणीचा निर्णय आहे. मला राजकारणाशी काही देणंघेणं नाही. मी सध्या जे काम करत आहे, तेच काम करत राहीन. निवडणुकीत मी तिच्यासाठी प्रचारही करणार नाही. कारण तिने स्वत:च कष्ट करावेत, असं मला वाटते. मी नेहमीच राजकारणापासून किंवा कोणत्याही राजकीय संबंधांपासून दूर राहणार आहे,' असेही सोनू सूद याने स्पष्ट केलं आहे.

मला बहिणीने घेतला निर्णयाचा आदरही आहे. मागील काही वर्षांपासून ती तिथे राहत आहे. स्थानिक लोकांच्या समस्या तिला चांगल्यारीतीने माहित आहेत. ती लोकांच्या संपर्कात राहून त्यांना थेट मदत करेल, असंही सोनू सूद म्हणाला. दरम्यान, कोरोना काळामध्ये सूद याने अनेकांना मदतीचा हात पुढे करत लोकांची मनं जिंकली आहेत. विशेषत: स्थलांतरित मजूरांसाठी त्याने मोठं कामं केलं आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यासाठी त्याने मोठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तो सतत प्रकाशझोतात आहे. त्याचा फायदा बहिणीला निवडणुकीत होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT