Srabanti Chatterjee Sarkarnama
देश

अभिनेत्रीचा भाजपला दे धक्का! सात महिन्यांतच पक्षाला सोडचिठ्ठी

आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. सात महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election) तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपला (BJP) धूळ चारली होती. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. सात महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

बंगाली अभिनेत्री श्रावंती चटर्जी यांनी मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपची साथ धरली होती. आज त्यांनी ट्विट करीत पक्षावरच बॉम्ब टाकला. त्यांनी पक्षाशी असलेले सर्व संबंध तोडून टाकत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी मागील विधानसभा निवडणूक लढलेल्या भाजपशी सर्व संबंध तोडून टाकत आहे. पक्षात कोणताही उत्साह दिसत नाही. याचबरोबर बंगाली जनतेच्या हितासाठीचा प्रामाणिकपणाही पक्षात दिसत नाही.

श्रावंती चटर्जी यांनी भाजपला रामराम केला असला तरी तृणमूलमध्ये जाण्याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यांच्या ट्विटवर अनेक जणांनी त्या तृणमूलमध्ये जाणार का, अशी विचारणा अनेकांनी केली होती. यावर त्यांनी येणारा काळच ठरवेल, असे सूचक उत्तर दिले आहे. यामुळे त्यांचा आगामी काळात तृणमूलमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत भाजपमधून पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय, माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्यासह विश्वजीत दास, तन्मय घोष आणि सौमेन रॉय या तीन आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममध्ये पराभव झाला होता. नंतर पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या चार मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. या चारही ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT