नवी दिल्ली : केंद्र सरकारने काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पद्म पुरस्कार (Padma Awards) प्रदान केला आहे. यावेळच्या पद्म पुरस्कारांवरून वाद निर्माण झाला होता. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला होता तर, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला होता. यात आझाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या प्रकरणी मौन सोडून आझादांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषण पुरस्कार देऊन आझाद यांचा सन्मान केला आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आझाद यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, एखाद्याचे कामाचे कौतुक देश अथवा सरकारकडून होते, ही चांगली भावना आहे. माझ्या कामाला कुणीतरी पसंती दिली, हे मला आवडले आहे. माझ्या आयुष्यातील चढउतारामध्येही मी कायम जनतेची सेवा करीत आलो आहे. सामाजिक अथवा राजकीय भूमिकेतून जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री म्हणून मी जनतेलाच प्राधान्य दिले. सरकार आणि देशातील जनतेने दिलेल्या या पुरस्काराबद्दल मी समाधानी आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यापासूून वादाच्या भोवऱ्यात
पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर आझाद यांचे कौतुक होत असतानाही त्यांच्यावर टीकाही केली जात होती. त्यांनी ट्विटरवरील त्यांची माहिती बदलल्याची चर्चाही सुरू झाली होती. यावर आझाद यांनी हा सर्व खोडसाळपणा असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, काही जणांकडून जाणीवपूर्वक खोडसाळपणे माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. गोंधळ निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. माझ्या ट्विटर प्रोफाईलमधील कोणतीही माहिती मी काढून टाकलेली नाही अथवा त्यात कोणतीही भर टाकलेली नाही. माझा प्रोफाईल आधी होता तसाच आहे.
जयराम रमेश यांनी केलं होतं लक्ष्य
आझाद यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर त्यांचे सहकारी जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला होता. पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म भूषण पुरस्कार जाहीर नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. हेच निमित्त साधत जयराम रमेश यांनी आझादांना लक्ष्य केले होते. भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारल्याचे एक ट्विट रिट्विट करत रमेश यांनी म्हटले होते की, 'योग्य पाऊल उचललं. त्यांना आझाद राहायचं आहे, गुलाम नव्हे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.