अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणाचा (Ahmedabad-serial blast) १४ वर्षांनंतर निवाडा झाला. विशेष न्यायालयाने ३८ दोषींना मृत्युदंडाची तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या बॉम्बस्फोटांच्या भीषण मालिकेमध्ये ५६ जण ठार झाले होते तर २०० जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटप्रकरणी ८ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ४९ लोकांना दोषी ठरविले होते तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या ७० मिनिटांच्या अवधीमध्ये शहरभर २१ स्फोट झाल्याने अवघा देश हादरला होता. न्यायालयाने सात हजार पानी निकालपत्रामध्ये हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत ३८ जणांना मरेपर्यंत फाशी आणि अन्य अकराजणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले. या प्रकरणातील ३८ आरोपींना भारतीय दंडविधान संहितेच्या ‘कलम- ३०२’ (खून) आणि ‘१२० ब’ (गुन्हेगारी कटकारस्थान रचणे) आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींअंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने ४८ दोषींना २ लाख ८५ हजारांचा दंड ठोठावला तर अन्य एकास २ लाख ८८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. या बॉम्बस्फोटामध्ये मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
सर्वांची उपस्थिती..
ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली त्या दोषींमध्ये सफदर नागोरी, कय्युमुद्दिन कपाडिया, झाहिद शेख, कमरूद्दीन नागौरी आणि शमशुद्दीन शेख यांचा समावेश आहे. आजच्या सुनावणीला आठ विविध ठिकाणांवरील तुरुंगात डांबण्यात आलेले दोषी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. सध्या त्यांना अहमदाबाद, तिहार, दिल्ली, भोपाळ, गया, बंगळूर, केरळ आणि मुंबईतील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
ही पहिलीच वेळ...
एखाद्या खटल्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दोषींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी एका प्रकरणामध्ये २६ जणांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणात ३८ जणांना मृत्युदंड ठोठावण्यात आला आहे, असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच ७७ आरोपींविरोधातील या खटल्याची सुनावणी संपुष्टात आली होती. यातील ७८ आरोपींपैकी एकजण माफीचा साक्षीदार बनला होता.
आणखी चौघांना अटक..
या खटल्याची सत्र न्यायालयातील सुनावणी डिसेंबर- २००९ मध्ये सुरू झाली होती. इंडियन मुज्जाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेशी संबंधित ७७ जणांविरोधात हा खटला चालला होता. या प्रकरणात आणखी चार आरोपींना नंतर अटक करण्यात आली होती पण त्यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
सुरतमधील बॉम्ब फुटलेच नाही...
अहमदाबादेतील विविध ठिकाणांवर हे बॉम्बस्फोट झाले होते त्यात सरकारी रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय, बस, गाड्यांची पार्किंगची स्थळे आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांवर हे स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेत ५६ जण मरण पावले होते. या स्फोटांनंतर दुसऱ्या दिवशी सुरत शहरामध्ये २९ जिवंत बॉम्ब सापडले होते पण सुदैवाने ते न फुटल्याने मोठी जीवितहानी टळली होती.
गुन्हे शाखेकडून तपास...
न्यायालयाने या प्रकरणी दाखल झालेले अहमदाबाद पोलिसांचे २० आणि सुरत पोलिसांचे १५ एफआयआर एकत्र केले होते. राज्य सरकारने या स्फोटाच्या तपासाचे प्रकरण अहमदाबाद गुन्हे शाखेकडे सोपविले होते. तत्कालीन पोलिस सहआयुक्त आशिष भाटियायांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. सध्या हेच भाटिया गुजरातचे पोलिस महासंचालक आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया..
आतापर्यंत तब्बल नऊ न्यायायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्या. बेला त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने १५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोप निश्चित केले होते. सध्या त्याच त्रिवेदी या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. आज विशेष न्यायाधीश ए.आर. पटेल यांनी निकाल दिला त्यांनी १४ जून २०१७ पासून या खटल्याच्या सुनावणीला सुरूवात केली होती.
आयएम, सिमीचा हात
इंडियन मुज्जाहिद्दीन आणि स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनांचा या बॉम्बस्फोटांमागे हात होता असा दावा पोलिसांनी केला आहे. गुजरातमध्ये गोधरा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी इंडियन मुज्जाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.