New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महाराष्ट्रात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या पक्षाचे 41 आमदार निवडून आले आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेना या पक्षांनीही अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यानंतर आता अजितदादांनी पक्षाला राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी कंबर कसली.
दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह पक्षाचे दिल्लींसह विविध राज्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील विजयाबद्दल पक्षाच्या वतीने अजितदादा आणि सर्व नेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रफुल पटेल यांनी पक्षाचे पुढचे लक्ष्य आता दिल्लीची विधानसभा निवडणूक असल्याचे स्पष्ट केले. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पक्षाकडून लढवली जाणार असल्याच पटेलांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगताना ते म्हणाले, पक्षाला चार राज्यांत प्रादेशिक पक्षाचा दर्जा हवा आहे. महाराष्ट्र, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आपण लवकरच राष्ट्रीय दर्जा परत मिळवू, असा विश्वास पटेलांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा देशभरातील विविध राज्यांमध्ये विस्तार झाला होता. पण काही कारणांमुळे हा विस्तार ठप्प झाला होता. आता पुन्हा पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनीही पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचप्रमाणे अर्थ खातेही त्यांच्याकडेच राहू शकते. तर मागील सरकारमध्ये त्यांच्या पक्षाकडे असलेली खाती नव्या सरकारमध्येही मिळू शकतात, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.