Ambulance Accident Sarkarnama
देश

Helicopter Crash : मृतदेह नेणाऱ्या दोन रुग्णवाहिकांना अपघात

हेलिकॉप्टर अपघातात बुधवारी बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. या अपघातात रावत यांच्यासह 13 जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांचे मृतदेह गुरूवारी सुलूर एअरबेसकडे रुग्णवाहिकांमधून नेण्यात आले. यादरम्यान दोन रुग्णवाहिकांचा अपघात झाला. त्यानंतर या रुग्णवाहिकांमधील मृतदेह तातडीने दुसऱ्या रुग्णवाहिकांमध्ये हलवत रवाना करण्यात आले.

रावत यांच्यासह 13 जणांचे मृतदेह दिल्लीत आणले जाणार आहेत. त्यासाठी हे मृतदेह वेलिंग्टन येथून रुग्णवाहिकेतून सुलूर एअरबेसकडे नेण्यात आले. यादरम्यान दोन रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. मागील रुग्णवाहिकेने त्यापुढील रुग्णवाहिकेला धडक दिली. त्यामुळे पुढील रुग्णवाहिकेच्या चालकाचा ताबा सुटून ही रस्त्याच्या कडेला डोंगरावर जाऊन आदळली. या अपघातानंतर रुग्णवाहिकेतील मृतदेह तातडीने दुसऱ्या रुग्णवाहिकेत हलवण्यात आले. या अपघातात काही पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची तीव्रता खूपच भयानक असल्याचे आता समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघात एवढी भीषण होता की, मृतांची ओळख पटवणे अवघड बनले आहे. केवळ चारच जणांच्या मृतदेहांची ओळख पटवता आली आहे. त्यात जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर आणि आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांची ओळख पटवता आलेली नाही. ओळख पटवण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची मदत घेतली जात आहे. याचबरोबर इतर वैद्यकीय तपासण्यांचा आधार घेतला जात आहे. ओळख पटल्यानंतरच हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत बोलताना रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करणार आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स आता सापडला आहे. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

जनरल बिपिन रावत हे काल (ता.8) तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. परंतु, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंग, नायक गुरूसेवकसिंग, नायक जितेंद्रसिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT