Donald Trump, Stormy Daniels Sarkarnama
देश

Donald Trump Convicted : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी दोषी

Rajanand More

New York : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या आधीच त्यांना न्यूयॉर्क कोर्टाने हश मनी प्रकरणात दोषी धरले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात एकूण 34 आरोपांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यूर्याकमधील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता कोर्टाने ट्रम्प यांच्यावरील दोष निश्चित केले. त्यांना 11 जुलैला शिक्षा सुनावणी जाणार आहे.

ट्रम्प यांना पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी असलेले संबंध अंगलट आले आहेत. 2016 मध्ये पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीआधीच स्टॉर्मीने हा दावा केल्याने अमेरिकेत खळबळ उडाली होती. या प्रकरणाला प्रसिध्दी मिळू नये म्हणून ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तब्बल 1 लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

स्टॉर्मीला पैसे दिल्याचे लपवण्यासाठी ट्रम्प यांनी बिझनेसमधील व्यवहारांमध्येही हेराफेरी केल्याचा आरोप होता. अशा एकूण 34 आरोपांमध्ये त्यांना दोषी धरण्यात आले आहे. जवळपास साडे नऊ तास अंतिम सुनावणी सुरू होती.

सुनावणीवेळी ट्रम्प कोर्टातच उपस्थित होते. सुनावणीदरम्यान अत्यंत शांत बसलेल्या ट्रम्प यांनी निकाल येताच डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, फौजदारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. आतापर्यंत कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षांना एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलेले नाही. निकालानंतर ट्रम्प यांनी सुचक विधान केलं आहे.

खरा निकाल नोव्हेंबरमध्ये लागणार असल्याचे टॅम्प यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ट्रम्प यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. त्यासाठी जोरदार प्रचारही सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT